बहुजन क्रांतिमोर्चाचा राहुरी तहसीलवर मोर्चा

0
राहुरी (प्रतिनिधी) – ईव्हीएम बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने राहुरी शहरातून तहसील कार्यालयावर भर तळपत्या उन्हात मोर्चा काढण्यात आला. ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ यासह महापुरुषांच्या घोषणांनी शहर आणि परिसर दणाणून गेला होता. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांना देण्यात आले.
काल शनिवारी (दि.20) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विराट असा बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बहुजन समाज उपस्थित होता. राहुरी बसस्थानकापासून सुरूवात होऊन मोर्चा नवीपेठमार्गे शनिचौक, स्टेशन रोडवरून तहसील कार्यालयावर धडकला.
राज्य सरकारचा निषेध असो, निवडणूक आयोगाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. ई.व्ही.एम बंद करून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, शेतीमालाला हमी भाव देऊन शेतकर्‍यांना कर्जमुक्त करावे, वनजमिनींवरील अतिक्रमणे नियमित करून मूळ मालकाची सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यात यावी, राहुरी तालुक्याचा पश्‍चिम भाग डोंगरी व आदिवासी जाहीर करावा, तालुक्यात असणार्‍या झोपडपट्टीधारकांना राहात्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळावे, छत्रपती शिवराय, अहिल्याराणी होळकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची स्मारके तालुक्यात उभारण्यात यावीत, मुस्लीम, शीख, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन, लिंगायत यांच्यासाठी कम्युनल कायदा बनविण्यात यावा, अशा आणि विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मोर्चात संतोष रोहोम, दीपक वाळे, अरुण डोंगरे, प्रशांत शिंदे, मच्छिंद्र गुलदगड, सोन्याबापू जगधने, डॉ. रमेश गायकवाड, अब्दुलभाई आतार, राहुल जगधने, संदीप कोकाटे, संजय संसारे, संतोष वाघमारे, संदीप पाळंदे, अमर सातुरे, सचिन गायकवाड, उत्तम विघे, सचिन बनसोडे, सुनीताताई पवार, पापा बिवाल, शालिनीताई पंडित, नानाभाऊ जुंधारे, अनिल बिडवे, संदीप ओहोळ, विश्‍वास जगधने आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चेकर्‍यांच्या वतीने नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*