राहुरीच्या तरुणीवर अत्याचार व गर्भपात प्रकरण : मंत्र्याचा बॉडीगार्ड महिन्यानंतर पोलिसांना शरण

0

पाच दिवस पोलीस कोठडी
अहमदनगर (प्रतिनिधी) – बीएससी च्या वर्गात शिकणार्‍या एका राहुरीच्या विद्यार्थीनीवर नगरमध्ये एका मंत्र्याच्या बॉडीगार्डने अत्याचार करुन गर्भपात केला होता. या गुन्ह्यातील आरोपी एक महिना पसार होता.

मात्र बुधवारी (दि. 4) दुपारी तो पोलिसांनी शरण आला आहे. त्यात जिल्हा न्यायाधीश नावंदर यांच्यासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश रामदास अकोलकर (रा. पाईपलाईन रोड) असे आरोेपीचे नाव आहे.

5 सप्टेंबर 2017 रोजी राहुरीच्या एका तरुणीवर अकोलकरने अत्याचार करुन गर्भपात केल्याची घटना उघड झाली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, अत्याचार, गर्भपात या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करीत असताना सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांना आरोपीला अटक करण्यात अपयश आले.

या दरम्यान आरोपीने जमीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र त्यास अपयश आले. त्यामुळे अखेर अकोलकर स्वत:हुन पोलिसांना शरण आला. आरोपीस जामीन मिळू नये यासाठी पिडीत विद्यार्थीनीने न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तर अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पायपीट केली होती. त्यामुळे पोलिसांवर देखील दबाव कायम होता. इतक्या मोठ्या गुन्ह्यात जामीन मिळणे शक्य नाही. हे पोलीस देखील जाणून होते. त्यामुळे पोलिसांनी देखील आरोपीचा पाठलाग केला नाही. अखेर अकोलकर पोलिसांनी शरण आला.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पिडीत मुलीने पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. तपास समाधानकारक नाही. या गुन्ह्यातील डॉक्टर, पोलीस यांच्यासह कुटुंबियांना सहआरोपी करण्यात आले नाही. बड्या नेत्यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे तपासात दिरंगाई व आरोपींची पाठराखण केल्याचा आरोप केला जात आहे.

त्यामुळे हा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी पिडीत विद्यार्थीनीने दि. 29 सप्टेंबर रोेजी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे. बुधवारी अकोलकर यास दुपारी अटक केल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी तपासाकामी पोलीस कोठडीची मागणी केली होती.

या गुन्ह्यात अनेकांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्याची योग्य चौकशी करुनच कारवाई करणे पोलिसांना योग्य वाटले. त्यामुळे अकोलकरला पोलीस कोठडीत काय जबाब देतो यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यानुसार पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. या गुन्ह्यात सखोल तपास करून कारवाई केली जाईल असे तपासी अधिकारी शिंदे यांनी सांगितले आहे.

मंत्री व आमदाराला सहआरोपी करा – 
आरोपी गणेश अकोलकर हा एका मंत्र्याचा बॉडीगार्ड आहे. तसेच एका आमदाराचा जवळचा नातेवाईक देखील आहे. त्यामुळे या दोघांनी संगनमताने आरोपीस पाठीशी घातले आहे. तसेच हा गुन्हा मागे घेण्यास भाग पाडून, जाळून मारणे किंवा अपघात करून ठार करण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहे. असा अर्ज पिडीत विद्यार्थीनीने दि. 27 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना केला आहे. त्यामुळे मंत्री व आमदारास सहआरोपी करा अशी मागणी तिने केली आहे. तसेच तिच्या जिवितास धोका असून पोलीस संरक्षणाची मागणी देखील करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षकांना विनंती अर्ज – 
पिडीत मुलगी अनाथ असल्यामुळे तिच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे कोणी नाही. तर दुसर्‍या बाजूने आरोपीच्या पाठीशी मातब्बर राजकारणी व प्रशासन भक्कमपणे उभे आहे. अत्याचार झाल्यानंतर तिला अद्याप कोणत्याही विभागाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही विद्यार्थीनी मागासवर्गीय असून शासन नियमानुसार तिला मदत मिळणे गरजेेचे होते. मात्र प्रशासनाकडून माझ्यावर अन्याय होत असून तत्काळ अर्थसहाय मिळावे असा विनंती अर्ज तिने दि. 29 सप्टेंबर रोेजी एसपींना केला आहे.

LEAVE A REPLY

*