Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राहुरीचा उद्योजक छोट्या विमान उत्पादनात

Share

दक्षिण आफ्रिकेतील मायक्रो एव्हिएशन कंपनीशी झाला करार

अहमदनगर (प्रतिनिधी) – सैन्य व निमलष्करी दले, नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य, शेती यासाठी उपयुक्त असलेल्या मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा उत्पादक म्हणून नगरी चेहरा दिसणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर राहुरीचे उद्योजक विजय सेठी यात यशस्वी झाले आहेत. ‘बॅट हॉक’ मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या त्यांच्या कंपनीने दक्षिण आफ्रिकेतील ‘मायक्रो एव्हिएशन’ या कंपनीशी करार केला. त्यावर शुक्रवारी मुंबईत सह्या झाल्या.

मेक इन इंडिया अंतर्गत या विमानांचे उत्पादन संबंधित सरकारी खात्यांची परवानगी मिळताच महाराष्ट्रात तातडीने सुरू होणार आहे. त्यामुळे 125 ते 150 व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल. मुंबईत आज झालेल्या करारावर मायक्रो एव्हिएशनचे कार्यकारी संचालक टेरी पापस व मॅक्स लिंक अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष विजय सेठी यांनी सह्या केल्या.

या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या व्यापार व उद्योग विभागाच्या आशिया विभागाचे संचालक तुलानी एम्पेटसेनी, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या महाराष्ट्र परिषदेच्या अध्यक्षा कश्मिरा मेवावाला, इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष मनप्रीत सिंग, दक्षिण आफ्रिकेच्या सामडेकचे (एक्सपोर्ट काउन्सिल) कार्यकारी संचालक सँडायल एन्डीलोवू उपस्थित होते. हा करार दोन्ही देशांमधील औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने पोषक व महत्त्वाचा असल्याचे उपस्थितांनी नोंदविले.

साहसी हवाई क्रीडाप्रकाराची आवड जोपासलेले सेठी म्हणाले की, छंदाचे रूपांतर उद्योगामध्ये करण्याची कल्पना सुचली. केंद्र सरकारच्या मेक इन इंडियामुळे हे साध्य करता येणे शक्य असल्याने मॅक्सलिंक कंपनीने मायक्रो एव्हिएशन कंपनीशी बोलणी केली. मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या निर्मितीत या कंपनीचा मोठा अनुभव असून, त्यांनी आतापर्यंत सुमारे 500 विमाने उत्पादित करून चीन, ऑस्ट्रिया आदी देशांमध्ये विकली आहेत. याच कंपनीचे तंत्रज्ञान वापरून या विमानांची पूर्णपणे भारतात जुळणी केली जाणार आहे.

त्यासाठी लागणारे अन्य भाग प्राधान्याने स्वदेशी निर्मितीचे असतील. महाराष्ट्रात, शक्यतो पुणे परिसरात हा उद्योग उभा राहील. मुंबईत झालेल्या करारानुसार मॅक्सलिंक येत्या तीन वर्षांमध्ये 200 विमानांची जुळणी करून विक्री करील. या उद्योगामुळे भारतात मायक्रोलाईट एअरक्राफ्ट उत्पादनाचा श्रीगणेशा होत आहे. दोन व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या या विमानाची किंमत साधारणपणे 45 लाख रुपये म्हणजे अत्याधुनिक शानदार मोटारीएवढी असेल.

इंधन व देखभालीचा खर्च अतिशय कमी असून, नेहमीच्या पेट्रोलवर ते उडते. पेट्रोलचा वापर तासाला 16 लिटर असा वाजवी आहे. जगप्रसिद्ध रोटॅक्स इंजिनचा त्यात वापर केला असून, अन्य सुटे भाग सहज उपलब्ध होतात. ही लाईट एअरक्राफ्ट भारतात सर्व दृष्टीने उपयोगी पडतील. संरक्षण दले, सीमा सुरक्षा दले, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, पाहणी, पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारणी यासाठी त्याचा सहज उपयोग करता येतो. हेलीकॉप्टरसाठी हा अतिशय सुरक्षित पर्याय असल्याचेही श्री. सेठी म्हणाले.

चौकट….

नगरकरांसाठी अभिमानास्पद
राहुरीत शालेय शिक्षण व नगरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या सेठी यांना साहसी क्रीडा प्रकाराची आवड आहे. पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंगमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यातूनच त्यांनी मुंबईच्या साजिद चौगले यांच्यासह सहा महिन्यांपूर्वी नगर येथे पॅरामोटर बेस जंपचा, म्हणजे पॅरामोटरमधून जमिनीवर उडी मारण्याचा विक्रम केला. काही वर्षांपूर्वी उद्योगानिमित्त पुण्यात गेलेल्या सेठी यांनी मॅक्सलिंक उद्योगसमूह सुरू केला. विविध देशांमध्ये जाळे असलेला हा उद्योगसमूह उत्पादन, सेवा या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा कारखाना महाराष्ट्रातच सुरू करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

बॅट हॉकची वैशिष्ट्ये
– उड्डाणासाठी व उतरण्यासाठी अवघ्या 80 मीटर धावपट्टीची गरज. एका मिनिटात एक हजार फूट वरती जाण्याची क्षमता.
– साध्या पेट्रोलवरही चालते अन सहा तासांची उड्डाणक्षमता.
– प्रतिकूल वातावरणात उड्डाण करण्याच्या दृष्टीने डिझाईन. वाईट वातावरणातही व्यवस्थित चालविता येण्याच्या सुविधा
– इंजिन व विमानाचे सुटे भाग सहजपणे उपलब्ध.
– वेग कमी ठेवण्याची क्षमता असल्याने नैसर्गिक आपत्तीच्या काळी मदतकार्यास सोपे
– पिकांवर औषधाची फवारणी करणे शक्य.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!