राहुरी तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

0
राहुरी (प्रतिनिधी) – कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून ते मागे घेण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी राहुरी तालुक्यातील 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तहसीलदारांना कृषी निविष्ठा व्यावसायिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, यवतमाळ जिल्ह्यात पिकावर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक फवारणीमुळे, विषबाधा झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. तसेच बरेच शेतकरी व शेतमजूर बाधित झाले आहेत.
या दुर्दैवी घटनेबद्दल आमची संघटना व राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते अत्यंत दुःखी आहेत. मात्र, या घटनेचे खापर केवळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर फोडण्यात येत आहे. याप्रकरणी कृषी निविष्ठा विक्रेत्यास जबाबदार धरून कृषी विभागामार्फत पोलीस कारवाई, विक्री परवाना रद्द करणे, विक्री बंद आदेश देणे, अशा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येत असल्याने व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे.
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा व्यवसाय बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले, ते मागे घेण्यात यावे, निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत देण्यात यावे, ऑनलाईन परवान्यात समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत, परवान्यामध्ये कीटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्याकरता मुदत देण्यात यावी, यासह अन्य मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना चंद्रकांत उंडे, सचिन वने, अनिल डावखर, अनिल पाटील, रवींद्र मुसमाडे, सुरेश भोसले, सविनाथ पवार, दीपक शेळके, अजित तारडे, संदीप अडसुरे, महेश पानसरे, सोमनाथ गाडे, विश्‍वास कुलकर्णी, कविता बिडवे, नवनाथ सप्रे, रवींद्र कदम, राहुल जुंदरे, आबा कदम, सचिन भुजाडी, भास्कर भुसारी, श्रीराम घाडगे, संतोष ढूस, अंकुश गाडे, आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*