राहुरीच्या 7 वाळूतस्करांना शिक्षा

0

मंडल निरीक्षक व पोलीसास ठार मारण्याचा प्रयत्न 

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील मंडल निरीक्षक विष्णु रामचंद्र गायकवाड व पोलीस कर्मचारी पी. आर जाधव हे वाळूतस्करांना पकडण्यासाठी चिंचोली येथे गेले होते. त्यावेळी वाळूतस्करांनी त्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील सात जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सहा जणांना तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य एकास पाच वर्षांची शिक्षा व 20 हजार दंडाची शिक्षा दिली आहे.
10 मार्च 2012 रोजी राहुरीचे मंडल निरीक्षक विष्णू गायकवाड यांना राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे वाळूतस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस कर्मचारी पी. आर जाधव यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान वाळु चोरी करीत असताना अधिकारी आल्यामुळे आरोपींनी वाहनात बसुन पळ काढला. मात्र त्यांना अडविण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांच्या  जीवाला न जुमानता आरोपींनी वाळूचे वाहन गायकवाड व जाधव यांच्या अंगावर घातले. यात दोघे सरकारी कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

गुरूवारी (दि.8) जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. रामदास गवळी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सात जणांना दरोडा व खुनाचा प्रयत्न करणे तसेच अन्य कलमान्वये रमेश वाघु डूकरे,दीपक बबन लाटे, विठ्ठल जगन्नाथ लाटे, प्रकाश दत्तात्रय लाटे, रामदास माधव गागरे, आबासाहेब साहेबराव नलगे अशा सात जणांना तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड तर निखील बबन लाटे यास पाच वर्षाची शिक्षा व 20 हजार दंडाची शिक्षा दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*