मोदीजी कुणाचेच ऐकत नाही; मनात येते ते देशावर लादतात

खा. राहुल गांधींनी अमेठी दौऱ्यात पंतप्रधानांवर साधला निशाणा

0

अमेठी, ता. ४ : मोदीजी कुणाचेच ऐकत नाही, जे मनात येते ते देशावर लादतात. याउलट काँग्रेसची भूमिका जनमतासोबत चालण्याची आहे, असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टिका केली.

राहुल गांधी अमेठीच्या दौऱ्यावर असून येथे एका सभेत ते बोलत होते. खा. गांधी पुढे म्हणाले की काँग्रेसने प्रत्येक योजना आणण्यापूर्वी लोकांशी सल्लामसलत केली. त्यांचे मत जाणून घेतले. मात्र पंतप्रधान मोदीजींचे तसे नाही. ते सकाळी उठतात आणि एखादा नवीच योजना देशातील जनतेवर लादतात. मग जनतेला त्याची आवश्यकता असो किंवा नसो.

जीएसटीसंदर्भात राहुल म्हणाले की जीएसटी ही काँग्रेसने आणलेली योजना होती. काँग्रेसने त्यासंदर्भात उद्योजक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यांचे म्हणणे होते की जीएसटी लागू करा. पण देशाच समान कर ठेवा आणि तोही जास्तीत जास्त १८ टक्के पर्यंत. याच दिशेने काँगेस पक्ष काम करत होता.

मात्र पंतप्रधानांनी कुठलाही विचार  न करता देशातील व्यावसायिकांवर जीएसटी कर लादला. त्यातही चार वेगवेगळे कर आणि तेही २८ टक्क्यांपर्यंत ठेवले. शिवाय केंद्राचे कर वेगळे आणि राज्याचे वेगळे.  ते पुढे म्हणाले की जीएसटी यंत्रणा एवढी गुंतागुंतीची आहे की एखाद्या व्यापाऱ्याला जर चार वस्तू एकत्रित विकायच्या असतीला आणि प्रत्येकावर जीएसटी वेगळा असेल, तर त्याची नोंद कशी करायची हा त्याच्यापुढे प्रश्न असतो. दर महिन्याला जीएसटीचा फॉमही तितकाच गुंतागुंतीचा असल्याने व्यापाऱ्यांचा  वेळ आपल्या व्यवसायाऐवजी फॉर्म भरण्यातच जातो.

ते म्हणाले की यामुळे छोटे उद्योगधंदे बंद होत असून त्यामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. ते बेरोजगार होत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदीजी मात्र आधुनिक भारत आणि विकासाच्या गप्पांवर गप्पा मारत असतात.

खा. राहुल गांधी यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून आज दुपारीच त्यांचे येथे आगमन झाले. या दौऱ्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध घटकांशी ते संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

*