Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

राहात्यात धूमस्टाईल चोराचा पोलिसांवर गोळीबार

Share

पो. कॉ. पठारे गंभीर जखमी । पाठलाग करून श्रीरामपूरच्या ताकेस पकडले । दुसरा पसार

राहाता (तालुका प्रतिनिधी) – सोनसाखळी चोरणार्‍या दोघा संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या राहाता पोलीस ठाण्यातील पो. कॉ. पठारे यांच्यावर आरोपींनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. त्यात अजित पठारे जखमी झाले आहेत. दरम्यान एका आरोपीला कट्ट्यासह पकडण्यात यश आले. आरोपी हा श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील असून दुसरा आरोपी पसार झाला आहे.

ही घटना बुधवार दि. 20 रोजी दुपारी 1:20 वाजेच्या सुमारास राहाता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चितळी रोडवर गर्दीच्या ठिकाणी घडली. दोन संशयित पल्सर मोटारसायकलवर तोंडाला रुमाल बांधून शहरात फिरत असताना गस्तीवर असलेले पो. कॉ. अजित अशोक पठारे व पो. कॉ. रशीद शेख यांना त्यांचा संशय आला. ते त्यांच्या मागावर लक्ष ठेवून होते.

त्याचवेळी आरोपी हे शिवाजी चौकातून चितळी रोडने गणेशनगरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना समोरून मोटारसायकल आडवी घातली व पोलीस कॉ. अजित पठारे यांनी मागे बसलेल्या आरोपीची कॉलर पकडली असता आरोपी सचिन लक्ष्मण ताके (वय 32) याने त्याच्याजवळील गावठी कट्ट्याने पोलीस पठारे यांच्यावर गोळी झाडली. गोळी पठारे यांच्या गालाजवळ लागली. त्यामुळे त्यांना मोठी जखम झाल्याने रक्ताची धार लागली. सर्व कपडे रक्ताने माखले.

या झटापटीत पोलिसाची मोटारसायकल पडली. दुसरे पोलीस कॉ. रशीद शेख हे मोटारसायकलखाली अडकले असताना त्यांनी सहकार्‍यावर गोळीबार करणार्‍या आरोपीला पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करत असताना घटना पाहणार्‍या दोन तरुणांनी यावेळी आरोपीस पकडण्यास मदत केली.

दुसर्‍या आरोपीने त्याच्या ताब्यात असलेली पल्सर मोटारसायकल नंबर एमएच-15 सीएफ-8299 ही घेऊन जवळच्या व्यापारी संकुलातून एकलव्य वसाहतीत पळाला. मात्र पुढे मोटारसायकल न्यायला जागा नसल्याने त्याने ती तिथेच सोडून पत्र्याच्या घरावर चढून तो पळून जात असताना त्याच्या पायाला पत्रा लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याने अंगात निळा शर्ट घातलेला होता तर तोंडाला रूमाल बांधलेला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुख्य आरोपीला पोलीस व नागरिकांनी गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळी लागल्याने घटनास्थळी पठारे यांचे मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले होते. ताके अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

जखमी पोलीसास तातडीने राहाता ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शिर्डी संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. श्री. पठारे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी राहाता रूग्णालयात येऊन जखमी पोलीस कर्मचार्‍याची भेट घेतली व नंतर घटनास्थळाला भेट दिली. तसेच तपासाबाबत सुचना दिल्या. पसार आरोपी श्रीरामपूर परिसरातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या शोधासाठी शिर्डी, राहाता, श्रीरामपूर व राहुरी असे चार पोलिसांची पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी पो. कॉ. रशीद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि 307, 353, 352, 333, 34 आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून याच रस्त्यावर काही वर्षापूर्वी तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांच्यावरही एका आरोपीने गोळी झाडून पसार झाला होता.

आजच्या या घटनेने त्या जुन्या घटनेची चर्चा शहरात बोलली जात आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोन्ही पोलिसांच्या धाडसाचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.

  • दुसरा आरोपी श्रीरामपूर भागातील असल्याचा संशय
  • पसार आरोपी जखमी, त्याचा शोध सुरू
  • तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासनेंवरही याच भागात गुन्हेगाराने केला होता गोळीबार
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!