राहाता पालिकेचे चोरीला गेलेले वाहने परस्पर विकले

0

माहिती अधिकारात माहिती उघड ः गुन्हा दाखल करण्याची मागणी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता पालिकेची जुनी अग्नीशामक गाडी पालिका कर्मचार्‍यांनी परस्पर विकली तिचे मिळालेले पैसेही पालिकेत भरले नाही. कर्मचार्‍यांनी ते स्वतःच वापरल्याची माहिती माहीती आधिकारात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते रियाज शेख यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांना पत्र देऊन याबाबत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान गाड्या चोरीला गेल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक सागर लुटे यांनी मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.
राहाता पालीकेची अग्नीशामक गाडी नंबर एम एच 17 सी 6581 व महेंद्रा कंपनीची गाडी एम एच 17 एजी 1553 या दोन गाड्यां पालिकेकडे होत्या. नादूरूस्त असल्याने हि दोन्ही वाहने अनेक वर्ष पालिकेच्या जागेत पडून होत्या. त्यांचा लिलाव करण्यासंबधी पालिकेने एका दैनिकात जाहीर लिलाव नोटीसही प्रसिध्द केली होती. मात्र त्यांचा लिलाव झाला किंवा नाही याची कोणतीही माहिती पालिका दप्तरी नाही.
पालिका मुख्याधिकारी यांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून ही वाहने पालिकेच्या वाहनतळापासून गायब झाली आहे. अग्नीशामक गाडीवर युनियन बँकेचे कर्ज आहे. तिचा लिलाव करताना परिवहन आधीकारी यांची परवानगी घेणेे व नोंदणी रद्द करणेे आवश्यक असताना तसे काहीही केले नाही. ह्या दोन्ही गाड्यांचा लिलाव न करताच परस्पर विक्री केल्याचे पालिका वर्तुळात बोलले जाते.
लिलाव झाला असता तर ज्या व्यापार्‍याने लिलाव घेतला त्याची अनामत रक्कम भरल्याची नोंद झाली असती. सदर लिलाव किती रूपयांना झाला व कोणत्या अधिकार्‍याच्या परवानगीने झाला याची कोणतीही माहीती पालिका दप्तरी नाही. वाहने परस्पर कोणी विकली, त्याचे पैसे कुठे गेले याबाबत चौकशी करून संबंधित दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेख यांनी केली आहे.
याबाबत शेख यांनी माहीती अधिकारात सर्व माहीती घेतली असता हा प्रकार उघडकिस आला असून तत्कालीन मुख्याधिकारी सतिष दिघे यांना याबाबत माहीती विचारली असता लिलावाबाबत पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. लिलावाची नोटीस काढली होती मात्र लिलाव झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही वाहने गायब होऊन दहा महिने झाले तरीही पालिका प्रशासनाने कोणतीही चौकशी केली नाही. पालिका प्रशासन या प्रश्नी गप्प का असा सवाल नागरीक विचारत आहे. एवढी मोठी घटना घडूनही पालिका प्रशासन चुप्पी साधून बसले ते या प्रकरणी कोणाला पाठीशी घालते का आहे यावरून चर्चा उलट सुलट चर्चा सुरू आहे.
ज्या कर्मचार्‍यांनी गाड्या विकल्या त्यांनी गाडी चोरीला गेल्याचा बोभाटा झाल्यावर गाड्यांचे पैसे पालिकेत जमा करण्यासाठी आणले मात्र ते लेखाधिकार्‍याने जमा करून घेण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे ते पैसे अद्यापही जमा झाले नाही. अशी खात्रीलायक माहीती पालिका वर्तुळातून मिळाली. पालिकेच्या या दोन गाड्या चोरीला गेल्या असल्याची तक्रार सत्ताधारी गटाचे नगरसेवक सागर लुटे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली असून या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  

LEAVE A REPLY

*