राज्याचे कृषीधोरण हवामानाधारित आखावे : ना. विखे

0

कृषीथॉनचे उदघाटन; मान्यवरांची उपस्थिती

नाशिक (प्रतिनिधी)- जागतिक स्तरावर होणार्‍या हवामान बदलांचा, पर्यावरणातील परिवर्तनाचा परिणाम कृषीक्षेत्रावर आणि पिकपद्धतीवर होतो. त्यावर मात करून उभारी कशी मिळवायची याचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना करणे गरजेचे आहे. शासनाने हवामानधारित राज्याचे कृषीधोरण ठरवावे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
ह्युमन सर्विस व मिडिया एक्झिबिटर्स आयोजित कृषीथॉन 2017फ या देशातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा काल (दि. 23) ठक्कर्स डोम येथे झाला. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. हेमंत गोडसे, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, जि. प. उपाध्यक्षा नयना गावित, विप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, कृषी विभागाचे सहसंचालक दिलीप झेंडे, राजाराम पानगव्हाणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शेतकरी युवक-युवतींना शेतकरी युवा सन्मान पारितोषिक देऊन केलेला गौरव हे उदघाटन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.
ना. विखे पाटील म्हणाले, राज्याचे हवामानानुसार 9 कृषी विभाग आहेत. कृषी विद्यापीठांची स्थापना त्यानुसार करण्यात आली आहे. या कृषी विभागांचे विभाजन करण्याची शिफारस पूर्वीच केली होती. ती होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना स्थैर्य प्राप्त होत नाही. शेतमालाचे गणित शेतकर्‍यांनीच ठरवावे म्हणजे अनुदानाची भिक मागण्याची वेळ येणार नाही असे त्यांनी सांगितले.
तसेच कर्जमाफीमध्ये राजकारण असून त्याचे तिन तेरा वाजले आहेत. सरकारला मर्यादा आहेत पण व्यवस्थेने लोकांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइनमुळे सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये संवाद राहिला नसून ते केव्हा ऑफलाईन करतील ते समजणार नाही, असाही टोमणा त्यांनी मारला. लोकशाहीत आंदोलने होतातच पण आंदोलकांनी पर्याय दयावेत.शेतीमालाला भाव कसा देता येईल हे सांगावे व याकडेही लक्ष वेधले.
माणिकराव ठाकरे म्हणाले की, कृषीक्षेत्रात आघाडीवर असलेल्या प्रगत नाशिक जिल्ह्याने अप्रगत विदर्भाला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. शासनाने कीटकनाशकांबाबत बारकाईने निर्णय घेण्याची गरज आहे. औषध विक्रेत्यांवर बंदी घालण्यापेक्षा कंपन्यांवर नियंत्रण ठेवावे. त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करावे. कापूस, सोयाबीन जेथे जास्त पिकवले जाते तेथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच पिकपॅटर्न बदलायला हवा असे त्यांनी नमूद केले. कृषीथॉनमध्ये नवे तंत्रज्ञान, नव्या कल्पना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतील त्यामुळे प्रयोगशीलतेला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संयोजक संजय न्याहारकर यांनी स्वागत केले. ते म्हणाले, मा. विखे पाटील यांचे पहिल्या प्रदर्शनापासून मार्गदर्शन लाभले आहे. यंदा 350 स्टॉल असून अंतराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे. लवकरच शेतकर्‍यांसाठी ई- मासिक सुरू करत आहोत असे त्यांनी सांगितले. साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविकात 19 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेऊन यंदा 12वे कृषीथॉन प्रदर्शन होत असल्याचे नमूद केले.
जिल्हा अ‍ॅग्रो डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजूनाना पाटील यांनी मनोगतात, नाशिक जिल्हा कृषीक्षेत्राद्वारे सर्वाधिक अंतराष्ट्रीय चलन मिळतो असे अभिमानाने सांगितले. ते म्हणाले, गेल्या वर्षी 2 लाख 52हजार मेट्रिक टन द्राक्षे नाशिक जिल्ह्यातून निर्यात झाली. क्रांतिकारी प्रगती करणार्‍या नाशिकच्या गरजा वेगळ्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कीटकनाशके फवारताना यवतमाळमध्ये काही शेतकर्‍यांचा बळी गेल्यानंतर शासनाने सर्व राज्यात अ‍ॅग्रोडिलर्सवर सरसकट कार्यवाही करते, ते अनुचित असल्याचे सांगून नाशिक व यवतमाळ यांत शासनाने अंतर ठेवावे, अशी शासनास विनंती केली.
खा. चव्हाण म्हणाले, कृषीथॉनने तारूण्यात पदार्पण केले आहे. नाशिकला शेतकरी पाणीदार असून तो जगातल्या शेतकर्‍यांना दिशा देतो. सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांचा गौरवाने उल्लेख करत त्यांचा आदर्श घेऊन शेतकर्‍यांनी आपले मार्केट तयार करावे. सरकारवर अवलंबून राहू नये असे सांगितले. विदर्भात औषधफवारणीने शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. त्याबाबत मार्गदर्शनपर स्टॉल असल्याचेही त्यांनी सांगितले.
नीलिमाताई पवार यांनी बोलतांना छोट्या शेतकर्‍यांपर्यंत नवे तंत्रज्ञान, ज्ञान पोहचून धान्य, फळे, प्रक्रिया उद्योग उभे रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिलीप झेंडे म्हणाले, 90 टक्के द्राक्षांची निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. दरडोई उत्पन्नात नाशिक आघाडीवर आहे. आगामी काळात भाजीपाला निर्यातीत वाढ होईल असे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन मुकुंद पिंगळे यांनी केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*