सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता मेटाकुटीला : ना. विखेंची टीका

0

बेलवंडीत शेतकरी मेळाव्यात ना. विखेंची टीका

बेलवंडी (वार्ताहर) – नोटाबंदीमुळे सामान्याना कोणताच फायदा झाला नाही, उलट उद्योग-व्यवसाय मोडकळीस आले. रांगेत उभे राहून नोटा बदलून घ्याव्या लागल्या. तीच परिस्थिती शेतकरी कर्जमाफीची झाली आहे. अजून पदरात काहीच नाही मात्र कर्जमाफी अर्ज भरणे, जाचक अटींची पूर्तता करणे यातच तासनतास वेळ वाया घालावा लागला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक व्यवसाय मोडकळीस आले आहेत. या सरकारने जनतेला मोठी स्वप्ने दाखविली मात्र प्रत्यक्षात काहीच दिले नसल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ना. विखे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. यावेळी अण्णासाहेब शेलार, ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, अनिल वीर, बाळासाहेब नाहाटा, केशव मगर, सरपंच सरस्वती डाके, भैरवनाथ सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनेश इथापे, बाळासाहेब गिरमकर, अरुणराव पाचपुते, पं. स. सदस्य सिध्देश्‍वर देशमुख, प्रा.तुकाराम दरेकर, कैलासराव पाचपुते, अतुल लोखंडे, कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वासराव थोरात, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोइटे, सुभाषराव काळाणे, उत्तम डाके, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष सोपान हिरवे, उपाध्यक्ष युवराज पवार, भैरवनाथ सोसायटीचे उपाध्यक्ष जयसिंगराव लबडे, उपसरपंच भाऊसाहेब दातीर आदी उपस्थित होते.
ना. राधाकृष्ण विखे म्हणाले, या सरकारच्या काळात शेतमालाला भाव मिळत नाही, अंगणवाडी सेविकांना मानधन मिळत नाही. सरकारच्या प्रत्येक निर्णयाने सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही सरकारच्या विरोधात लढत असून यापुढेही हे काम सुरूच राहील.
प्रास्ताविक सेवा संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब इथापे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. केशव कातोरे यांनी केले तर उपसभापती हरिदास शिर्के यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, तालुक्यातील नेते, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*