अनावश्यक खर्चाला जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी पायबंद घालावा : ना. विखे

0
लोणी बुद्रुक विकास संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील. समवेत व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व इतर मान्यवर ( छाया : दादासाहेब म्हस्के)
लोणी (वार्ताहर) – विकास सहकारी सेवा संस्थांचे कामकाज अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही. मोठे आकडे दाखवून जादा मेहनताना मिळविण्याच्या या प्रकारावर अंकुश ठेवण्याचे काम जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी करून विकास संस्था स्वभांडवली कशा होतील, याकडे लक्ष द्यावे, असे उद्गाार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या 95 व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ना. विखे बोलत होते. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, काशीनाथ विखे, किसनराव विखे, सुभाष विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे,
द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रामभाऊ धावणे, सिनेट सदस्य अनिल विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, विखे कारखान्याचे संचालक विक्रम विखे, तालुका विकास अधिकारी श्री. गुळवे, बँकेचे शाखाधिकारी अनिल खांदे, विकास संस्थेचे अध्यक्ष चांगदेव विखे, उपाध्यक्ष किशोर धावणे आदी उपस्थित होते.
ना. विखे म्हणाले की, विकास संस्था गाव पातळीवर विकासाचा कणा आहे. लहान शेतकर्‍यांना अर्थपुरवठा होण्यासाठी त्या प्रमुख आधार आहेत. बदलत्या काळानुसार या संस्थाही बदलल्या पाहिजेत. ऑनलाईन कामकाज त्यांनी करायला हवे. जिल्हा सहकारी बँकेच्या आजवरचा कारभार शिस्तीचा राहिल्याने बँक आर्थिकदृष्टया सक्षम आहे. सोसायट्यांच्या अनावश्यक खर्चावर पायबंद घालण्याचे काम त्यांनी करावे. सोसायटी तोट्यात आणि सचिवांना मेहनताना जादा कसा असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, या संस्था स्वभांडवली झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, सोसायट्यांनी उधारीवर खत विक्री करू नये. केली तर त्यावर व्याज आकारले पाहिजे. तसे केले नाही तर तोटा होऊ शकतो. विकास संस्था ही अतिशय महत्त्वाची असल्याने कारभार काटकसरीने केला पाहिजे. लोणी बुद्रुक संस्था शताब्दीच्या उंबरठ्यावर असून ती आर्थिकदृष्टया अधिक सक्षम झाली पाहिजे. खासदार नेहमी संस्थांना आर्थिक शिस्त पाळण्यासाठी सांगायचे. ही संस्था टिकली तरच सामान्य शेतकरी टिकेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. सारंगधर शंकर पा. म्हस्के यांच्या स्मरणार्थ गावातील विक्रमी ऊस उत्पादन घेणार्‍या तीन शेतकर्‍यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अनिल नामदेव वाबळे (आडसाली), प्रकाश साहेबराव विखे (सुरु) व कमलाबाई नथमल कटारिया (खोडवा) यांना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यावतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्यावतीने यावर्षी सभासदांना पाच टक्के लाभांश दिला जाणार आहे. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. गोरख विखे व मधुकर म्हस्के यांनी चर्चेत सहभाग घेतला.अध्यक्ष चांगदेव विखे यांनी सभासदांच्या शंकांचे निरसन केले. भागवतराव विखे यांनी अहवाल वाचन केले. किशोर धावणे यांनी आभार मानले. सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

राज्यातील मोजक्याच जिल्हा बँका चांगल्या स्थितीत असून त्यात या बँकेचा समावेश होतो. बँकेच्या अधिकार्‍यांनी विकास संस्थेच्या आर्थिक कामकाजावर अंकुश ठेवायला हवा. या संस्थांचे सचिव अंदाजपत्रक पत्रकात मोठे आकडे दाखवतात मात्र प्रत्यक्षात तसे कामकाज होत नाही. त्यांचा मेहनताना आणि बोनस वाढवून मिळण्यासाठी असे केले जाते का याचा शोध बँकेच्या अधिकार्‍यांनी घेतला पाहिजे. 

LEAVE A REPLY

*