Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

रब्बी हंगामासाठी 7 लाख 31 हजार हेक्टर क्षेत्र

Share

पावसाची सरासरी 96 टक्क्यांच्या पुढे : ज्वारीचे क्षेत्र 4 लाख 70 हजारांवर

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असून दक्षिण जिल्ह्यात ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला असून पावसाची सरकारी टक्केवारी 96 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा रब्बी हंगामासाठी 7 लाख 31 हजार क्षेत्राचे नियोजन केले आहे. यात ज्वारीचे क्षेत्र 4 लाख 70 हजार हेक्टर ठेवण्यात आले आहे.

नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परतीच्या दमदार पावसाच्या जोरावर आणि उत्तर जिल्ह्यात मुळा, भंडारदरा धरणाच्या जोरावर ऊस, गहू आणि हरभरा पिकाचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, असे असले तरी जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे. विशेष करून दक्षिण जिल्हा ज्वारीसाठी प्रसिध्द असून नगरच्या ज्वारीला राज्यात मोठी मागणी आहे. यामुळे जिल्ह्यात दरवर्षी ज्वारीचे क्षेत्र मोठे असते. यंदा देखील अशी परिस्थिती असून कृषी विभागाने ज्वारीचे क्षेत्र 4 लाख 70 हजार हेक्टरपर्यंत नियोजित केले आहे.

जिल्ह्यात ज्वारीचे 4 हजार 993 क्विंटल, गहु पिकाचे 53 हजार 767 क्विंटल, हरभरा पिकाचे 21 हजार 248 क्विंटल, सुर्यफुलाचे 20 क्विंटल, करडईचे 65 क्विंटल, मका पिकाचे 1 हजार 226 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. नगरच्या कृषी बाजारपेठेतील काही बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून जिल्ह्यात गोकुळ आष्टमीपासून ज्वारी पिकाच्या पेरणीला सुरूवात झाली आहे.

हंगामासाठी कृषी विभागाने 81 हजार 319 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली असून यात 60 हजार क्विंटल एकटा महाबिज बियाणे पुरविणार असून उर्वरित सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातून बियाणे घेण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनूसार जिल्ह्यात 96 टक्क्यांपुढे पावसाची आकडेवारी गेली असून दक्षिणेतील कर्जत, पारनेर या तालुक्यात आजही पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात मुबलक पाणीसाठा असून पुण्यातील धरणे भरल्याने दक्षिणतील काही तालुक्यांना त्याचा उन्हाळ्यात लाभ मिळणार आहे.
…………..
असे आहे क्षेत्र
ज्वारी 4 लाख 70 हजार हेक्टर, गहू 49 हजार 785 हेक्टर, हरभरा 1 लाख 18 हजार हेक्टर, सुर्यफुल 87 हेक्टर, करडई 844 हेक्टर आणि मका 27 हजार 245 हेक्टर यांचा समावेश आहे.
……………….
लष्करीने 50 टक्के मका बाधित
जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकर्‍यांनी चारा आणि उत्पन्न अशा दुहेरी हेतूने 71 हजार हेक्टरवर मका पिके घेतले होते. मात्र, सुरूवातीपासून मका पिकावर लष्कारी अळीने हल्ला केला. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 50 टक्के मका लष्करी अळीने बाधीत झाली आहे. यामुळे त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. याशिवाय उन्हाळ्यासाठी मूरघास तयार करण्यासाठी शेतकर्‍यांना अडचणीचे ठरणार आहे. तसेच लष्कारी अळीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास त्याचा फटका रब्बी हंगामातील ज्वारी पिकाला देखील आहे. लष्करी अळी कृषी विभागाला आव्हान ठरणार आहे.
……………..

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!