काष्टीच्या बाजारात अल्पदरात शुद्ध पाण्याची सोय

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी)– श्रीगोंदा बाजार समितीच्या उपबाजार काष्टी येथे जनावरे बाजारात बसविण्यात आलेल्या आर. ओ. फिल्टरचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नागवडे म्हणाले, काष्टी जनावरे बाजार सन 1970 पासून बाजार समितीच्या नियंत्रणाखाली चालत असून बाजार समितीने अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये अल्प दरामध्ये आर. ओ. फिल्टरचे पाणी योजना नक्कीच चांगली आहे.

तसेच पाचपुते म्हणाले काष्टी येथे जनावरे बाजारामुळे काष्टी गावच्या वैभवात भर पडली असून जनावरे बाजारात महाराष्ट्रासह इतर राज्यांतून शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी येत आहेत. बाजार समितीने केलेले 600 वृक्षांचे रोपणामुळे मोठी सावली निर्माण होणार असून निसर्गरम्य ठिकाण पुढील काळात प्रसिद्ध होईल. आर. ओ. फिल्टरचे थंड पाणी 2 रुपये लिटर व जनावरांना पिण्यासाठी 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी मिळणार आहे. काष्टी बाजारामध्ये उपसभापती वैभव पाचपुते यांनी विशेष लक्ष देऊन सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांची संख्या वाढलेली आहे. काष्टी गावचे नाव जनावरे बाजारामुळे देशामध्ये घेतले जात आहे.

आर. ओ. फिल्टरच्या शुद्ध पाण्याचा लाभ बाजारामध्ये येणार्‍या सर्व घटकांनी घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी केले. यावेळी जि. प. सदस्य सदाअण्णा पाचपुते, माउली पाचपुते, राकेश पाचपुते, जिजाबापू रोडे, लक्ष्मण नलगे, विठ्ठल पाचपुते, शहाजी भोसले, सयाजी पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, महेश दरेकर, दिलीप चौधरी, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे पाटील, उपसभापती वैभव पाचपुते सचिव दिलीप डेबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतीश पोखर्णा यांनी केले.

LEAVE A REPLY

*