Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हमीभावापेक्षा कमी दराने हरभर्‍याची खरेदी; व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट

Share

माहेगाव (वार्ताहर) – राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील व्यापार्‍यांकडून हरभरा उत्पादक शेतकर्‍यांची आथिक लूट सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भावाने हरभरा खरेदी केला जात असून शासनाच्या कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली असून संबंधित अधिकार्‍यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने हरभरा पिकाच्या विक्रीचे दर निश्चित केले आहेत. 4 हजार 620 रुपये हमीभावाने हरभरा व्यापार्‍यांनी खरेदी करावा, असे आदेश असताना मात्र, राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात हरभरा पिकाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भागात सध्या हरभरा पिकाची काढणी चालू आहे. मात्र, व्यापारी 3450 ते 3800 रुपयांप्रमाणे हरभरा खरेदी करीत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

यावर्षी ढगाळ हवामानामुळे हरभरा उत्पादनात मोठी घट झाली असून या भागात एकरी नऊ ते बारा क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मात्र, यावर्षीच्या दमट हवामानाने हे उत्पादन एकरी पाच ते सात क्विंटल एवढेच झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. सध्या विक्री होत असलेल्या भावात उत्पादन खर्चसुध्दा निघत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

गेल्या चार वर्षाच्या सलगच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. व्यापारी मात्र, शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आसताना शासकीय अधिकारी उघड्या डोळ्याने हे बघत आहेत. शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता तुम्ही तुमचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री करा, त्यांनी कमी भावात खरेदी केला तर आमच्याकडे लेखी तक्रार करा, असा सल्ला देतात.

ग्रामीण भागातील व्यापारी आमच्याकडे भुसार मालाचा परवाना आहे, असे सांगतात. मग शासनाचे यांच्यावर नियंत्रण का नाही? असा सवाल केला जात आहे. ग्रामीण भागातील व्यापार्‍यांना हमीभावापेक्षा कमीदराने खरेदी केली तरी चालते का? असा प्रश्न केला जात आहे. हरभरा पिकासाठी एकरी दहा हजार रुपये खर्च असतो. सध्या उत्पादनात मोठी घट होऊन पाच ते सहा क्विंटल उत्पन्न होत असल्याने फक्त उत्पादन खर्च निघतो. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!