Type to search

Featured सार्वमत

पुणतांबा येथील रेल्वेच्या नियोजित भुयारी पुलाच्या जागेचा तिढा कायम

Share

20 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, ग्रामस्थ व प्रवाशांना एकप्रकारे शिक्षाच

पुणतांबा (वार्ताहर)- श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता व वैजापूर या चार तालुक्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या पुणतांबा येथे ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही उड्डाणपूल किंवा भुयारी पुलाचे काम अद्यापही मार्गी न लागल्यामुळे पुणतांबामार्गे श्रीरामपूर-कोपरगाव-वैजापूर तसेच राहात्याकडे जाणार्‍या ग्रामस्थ, प्रवाशी वर्गाला रेल्वे सातत्याने बंद राहत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दौंड- मनमाड रेल्वे मार्गावर रेल्वे खात्याने कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर येथील अनेक रेल्वे चौक्यांच्या ठिकाणी भुयारी पुलाची कामे सुरू केली आहेत. पुणतांब्यापासून जवळच पाच किमी अंतरावर जळगाव चौकी तसेच चितळी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे फाटकात भुयारी पुलाचे कामे वेगाने सुरू आहे. मात्र पुणतांबा येथील भुयारी पुलाच्या जागेबाबत अद्यापही निश्चीत झालेले नाही. तसेच कामाचे अद्यापही टेंडर न निघाल्यामुळे पुणतांबा येथील उड्डाणपूल किंवा भुयारी पुलाचे काम नेमके केव्हा सुरू होईल याबाबत ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

दौड-मनमाड व पुणतांबा- शिर्डी रेल्वे मार्गावर पॅसेंजर मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्यामुळे पुणतांबा येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेले रेल्वे फाटक सातत्याने बंद राहण्याचे प्रकार वाढले आहेत. फाटक बंद राहिल्यानंतर येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. त्याचा फटका पुणतांबामार्गे प्रवास करणार्‍या प्रवाशांना बसतो. पुणतांबा येथे उड्डाण पूल असावा ही गेल्या 20 वर्षापासून पुणतांबेकरांची मागणी आहे. याबाबत सातत्याने घोषणा केल्या गेल्या. मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले. तीनवेळा सर्वेक्षण झाले.

सुरुवातीला 14 कोटीनंतर 19 कोटी रुपये खर्चाच्या नियोजित उड्डाणपुलाचे काम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता रेल्वेखात्याचा धोरणानुसार रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी पूल होणार असल्यामुळे पुणतांबेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी पुलास येथील व्यापारी वर्गाचा विरोध आहे. तर चांगदेवनगर रोडवर तालुका रोपवाटिकेच्यासमोर जागा देण्यास शेतकर्‍यांचा विरोध असल्यामुळे भुयारी पुलाचे काम मार्गी लागण्यात अडचणी निर्माण होत आहे. येथील रयत शाळेजवळ भुयारी पूल कमी खर्चात लवकर पूर्ण होईल ,असे ग्रामस्थांचे मत आहे. मात्र रेल्वे स्टेशन रोडवरून वाहतूक श्रीरामपूरमार्गे वळविताना रेल्वे खात्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढावी लागणार आहेत.

पुणतांबा येथील नियोजित भुयारी पुलाची जागा नेमकी कुठे निश्‍चित होईल याबाबत तर्क-वितर्क केले जात आहेत. काही झाले तरी चितळी, जळगाव चौकी व शिर्डी येथील भुयारी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पुणतांबा येथील भुयारी पुलाचे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. काम लवकर सुरू व्हावे यासाठी खा.सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पुणतांब्याचे शिष्टमंडळ रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ प्रबंधकांना भेटणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भास्कर मोटकर यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!