पुणतांब्यात आजपासून धरणे आंदोलन

0
पुणतांबा (वार्ताहर) – शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबा परिसरातील अनेक गावांतील शेतकरी आज गुरुवार 25 मे 2017 पासून धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.
22 मे रोजी किसान क्रांतीच्या पुणतांबा येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत 25 मे ते 30 मे पर्यंत तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलनाचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. ज्या पुणतांबा गावाने शेतकरी संपावर ही संकल्पना पुढे आणली त्या पुणतांबा गावात धरणे आंदोलन व्यापक स्वरूपात झाले पाहिजे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
त्यानुसार पुणतांबा गावात आजपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव, संदीप गिडे, योगेश रायते, शंकर दरेकर, किरण सुराळकर, दत्ता सुराळकर, सुहास वहाडणे, सुधाकर जाधव, संभाजी गमे, अशोक धनवटे, बाळासाहेब जाधव, गणेश बनकर, संजय जाधव, गणपत वाघ, सर्जेराव जाधव, प्रताप वहाडणे, भूषण वाघ आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पाहणी करून पुणतांबा येथील स्टेशनवरील शिवाजी चौकात धरणे आंदोलनाची जागा निश्‍चित केली आहे.
या ठिकाणी भव्य मंडप टाकण्यात येऊन सकाळी 11 वाजता शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून धरणे आंदोलनाची सुरुवात होणार आहे. धरणे आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून अचूक नियोजन करण्यात आले आहे.
बाहेरच्या शेतकर्‍यांना पुणतांबा गाव नेमके कुठे आहे हे समजावे म्हणून राहुरी, नेवासा, वैजापूर, शिर्डी, श्रीरामपूर येथे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक अंतर याची माहिती देणारे बोर्ड लावण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळावी, सातबारा कोरा व्हावा, शेतमालाला हमीभाव मिळावा, मोफत वीजपुरवठा व्हावा आदींसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी 1 जूनपासून संपावर जात आहेत.
या संपाला राज्यात 38 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. पुणतांबा येथील धरणे आंदोलनालाही अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून संघटनेचे पदाधिकारी सहभागी हेणार आहेत. शेतकरी संपाचे पुणतांबा हे केंद्र असल्यामुळे आजपासून सुरू होणार्‍या धरणे आंदोलनास कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

*