Saturday, April 27, 2024
Homeनगरपुणतांब्याची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पुणतांब्याची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने देशात पंचायत राज दिनानिमित्त काल सर्वत्र विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. पुणतांबा ग्रामपंचायत सभागृहांमध्ये सुद्धा काल विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती.

- Advertisement -

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. धनंजय धनवटे होते. सुरुवातीस राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत असणार्‍या विषयाचे वाचन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुणतांबा येथील शिक्षक दराडे यांनी केले. त्यामध्ये गरिबी मुक्त आणि उपजीविका रोजगार वृद्धीस पोषक गाव संकल्पना, आरोग्यदायी गाव बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, लिंग समभाव पोषक गाव आदींचे वाचन केले.

मंडलाधिकारी कावेरी आदिक यांनी वाळू लिलावासंदर्भात तहसीलदार यांचा अध्यादेश वाचन केले. यावर शिवसेनेचे सुहास वहाडणे यांनी सांगितले की, वाळू लिलावास आमचा कोणाचाही विरोध नाही. परंतु शासनाने सर्व नियमांचे पालन करावे. या ठरावास सर्जेराव जाधव व नामदेव धनवटे यांनी गावाच्यावतीने अनुमोदन दिले.

सुभाष कुलकर्णी यांनी गावाच्या विकासासाठी नवनवीन उद्योग सुरू झाले पाहिजे. तरुण वर्गाला काम मिळाले पाहिजे त्यादृष्टीने स्थानिक पदाधिकार्‍यांनी सहभाग नोंदवून ठाम भूमिका घ्यावी, तसेच कोणत्याही आगाराच्या बसेस चांगदेवनगरमार्गे येत नाही त्या बसेस सुरू कराव्यात. ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था व चांगले बस स्टॅन्ड निर्मिती करावी, असे नमूद केले.

सुनील कुलट यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पुणतांबा याठिकाणी दंतवैद्य व नेत्र वैद्य नाही ग्रामस्थांना त्या उपचारासाठी बाहेरगावी पैसे खर्च करून जावे लागते. यामुळे ग्रामस्थांची परवडत होते. गौतम थोरात यांनी स्टेशन रोड परिसरात सुलभ शौचालय ग्रामपंचायतीने बांधावे, सिटी सर्वे कार्यालय पुणतांबा येथे पहिल्याप्रमाणे सुरू करावे. तसेच मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांनी गावातच वास्तव्यास राहावे,असे निवेदन ग्रामपंचायतीस दिले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. धनवटे यांनी सांगितले की, जलसंधारण काम चांगले चालू आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत झाडे जतन करणे, त्यांचे संगोपन व पालन-पोषण निगराणी करणे, पुणतांबा गाव स्वच्छतेसाठी घंटागाडी सुरू आहे. तसेच ओला कचरा व सुका कचरा या घनकचरा व्यवस्थापनासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मिळतो. मुलांसाठी नवनवीन खेळणी व बगीचा निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांना रोजगार मिळालेला आहे, असेही ते म्हणाले.

प्रताप वहाडणे व सर्जेराव जाधव यांनी काही ठिकाणी काही नागरिकांनी जागे बाबतीत अतिक्रमण केलेले आहे हे निदर्शनास आणून दिले. यावेळी नूतन तलाठी बी. एस. लोखंडे यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. ग्रामसभेस उपसरपंच महेश चव्हाण, कृषी अधिकारी वाय. के. डाके, मनोज गुजराथी, प्रताप वहाडणे, नामदेव धनवटे, प्रदीप विधाते, सुनील कुलट, शेतकरी वर्ग, प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात विशेष ग्राम सभा संपन्न झाली. मात्र उपस्थिती अत्यंत कमी होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या