चाचणीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांची उत्सुकता शिगेला

पुणेगांव दरसवाडी डोंगरगांव कालव्याच्या चाचणीसाठी मंगळवारी सोडलेले पाणी

0

येवला । दि. 1 प्रतिनिधी
पुणेगांव दरसवाडी डोंगरगांव कालव्याच्या चाचणीसाठी मंगळवारी सोडलेले पाणी आजपर्यत सांगवी (ता.चांदवड) पर्यत पोहचले आहे. धरणातून पाणी प्रवाह सुरु राहिला तर हे पाणी दोन दिवसांत येवला हद्दीत येणार आहे.

त्यामुळे चाचणीचा आशावाद वाढला असून शेतकर्‍यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पाण्यासाठी राष्ट्रवादीसह शिवसेनेने पाठपुरावा केला आहे.

विटावे ता चांदवड़ इथपर्यंत पहिल्यांदाच पाणी आले असून येवला हद्दीपासुन अवघ्या 8 किमी अंतरावर पाणी दिसत असल्याने येवलेकरांची उत्सुकता शिगेला पोहचली असून परिसरातील गावात  आनदाचे वातावरण आहे.

चांदवडसह येवला या दुष्काळी तालुक्यांना जलसंजीवनी देणार्‍या पुणेगांव- दरसवाडी- डोंगरगांव या कालव्याचे काम नगरसूल (ता. येवला) पर्यत पूर्ण झालेले आहे. दिंडोरी तालुक्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस झालेला आहे. पुणेगांव, केद्राई व दरसवाडी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

पुणेगांव मधून ओव्हरफ्लोचे पाणी दरसवाडी धरणात सोडले आहे. केद्राईमधून देखील दरसवाडीत पाणी सोडलेले असून पुढे दरसवाडी- डोंगरगाव कालव्याच्या चाचणीसाठी नगरसूलपर्यत सोडले आहे.

येवला तालुक्यात या वर्षी सुद्धा जेमतेम पाऊस आहे. तालुक्यातील शेतकरी पुणेगांव- दरसवाडी- डोंगरगांव पाण्याही मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चाचणी साठी अनेक अडचणी असून परिसरातील शेतकरी स्वखर्चाने अडचणीतुन मार्ग काढत मदत करत आहेत.

यावर्षी पुणेगांव धरण पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत 766 मिमी पाऊस झाला असून धरणात 519 दलघफु इतका जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन गेटद्वारे नदीपात्रात 430 क्युसेस विसर्ग सुरु आहे. नंतर टप्याटप्याने कालवा 100 क्युसेसने प्रवाहित करण्यात आला आहे.

यावर्षी पुणेगांव सोबतच खडकओझर धरणाचेही ओव्हरफ्लोचे पाणी दरसवाडी धरणात सोडलेले आहे. त्यामुळे बाळापुर पर्यंत निश्चित कालव्याची चाचणी होईल अशी शेतकर्‍यांना आशा आहे.

LEAVE A REPLY

*