Monday, April 29, 2024
Homeनगरसिनेटसाठी श्रीरामपुरात 32 टक्के मतदान

सिनेटसाठी श्रीरामपुरात 32 टक्के मतदान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधरांच्या अधिसभा (सिनेट) सदस्य निवडणुकीसाठी आज घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी श्रीरामपुरात अवघे 32 टक्के मतदान झाले. 46 पुरुष आणि 7 महिला नोंदणीकृत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयात शहरातील मतदारांसाठी मतदानाचे केंद्र निश्चित करण्यात आले होते. 10 जागांसाठी सुमारे 37 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.

श्रीरामपूर शहरात अवघे 163 नोंदणीकृत पदवीधर मतदार होते. यामुळे हजारो पदवीधर यापासून वंचित राहिले. अनेक पदवीधरांनी पुणे विद्यापीठाच्या या वृत्तीचा निषेध केला आहे. अनेक मतदारांशी उमेदवारांनी संपर्कही केला नसल्याचे मतदानास्थळी दिसून आले. राज्यातील महाविकास आघाडी पुरस्कृत सावित्रीबाई फुले प्रगती मंडळ तर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच अशी ही लढत झाली. बोरावके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारांच्या छायाचित्रासह मोठा फ्लेक्स लावण्यात आला होता.

तर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचे काही कार्यकर्ते मतदानासाठी येणार्‍या मतदारांना त्यांच्या क्रमांकासह मार्गदर्शन करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता यास्थळी उपस्थित नव्हता. मतदान करताना अनेकांचा गोंधळ उडत होता. मतदान केंद्रात मतदारांची नावे शोधण्यातच वेळ वाया जात होता. बेलापूर महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यापीठ विकास मंचच्या कार्यकर्त्यांच्या नजरेस ही बाब आणून देत मतदारांना मतदानासाठी जाताना कोणत्या कलरच्या बॅलेट पेपरवर कोणाला मतदान करावयाचे आहे, त्यासाठी समुपदेशन केले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून प्रा. सुनील चोळके यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.

पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर अधिसभा सिनेट निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निष्क्रियपणे राबविण्यात आली. श्रीरामपूर शहरातील अनेक मतदारांची नावे मतदानासाठी थेट दुसर्‍या तालुक्यात टाकण्यात आली. नावे नोंदवूनही मतदार यादीत काही पदवीधरांची नावे आली नाहीत. मतदारांमध्ये जागृतीच झाली नसल्याने उमेदवार कोण आहेत आणि किती उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत, याबाबतही अनेक मतदार एकमेकांना विचारीत असल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या