पुणेरी पगडीवरून विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात गोंधळ

0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात शुक्रवारी पुणेरी पगडी की फुले पगडी यावरुन सुरु असलेला वाद उफाळून आला. पदवीदान सोहळ्यादरम्यान पुणेरी पगडीला विरोध दर्शवत चार विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या चारही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

पदवी प्रदान सोहळ्यासाठी विद्यापीठाने यंदा काळा घोळदार गाऊन आणि टोपी हा कॉन्व्होकेशन ड्रेस बदलून कुडता, पायजमा आणि उपरणे असा पोशाख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या पोशाखात असणाऱ्या पुणेरी पगडीला अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील गुरुवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विद्यापीठाने पगडीच्या वादात न पडता फक्त शिक्षण देण्याचे कार्य करण्याचा सूचक सल्ला देखील दिला होता.

मात्र, विद्यार्थी संघटनांचा विरोध डावलून सोहळ्यात उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांनी पुणेरी पगडी घातल्याचे दिसून आले. सोहळा सुरू असतानाच जनता दल युनायटेडचे सरचिटणीस कुलदीप आंबेकर, दयानंद शिंदे आणि शर्मिला येवले यांनी व्यासपीठाच्या दिशेने जात पुणेरी पगडीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यांना ताबडतोब सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेऊन चतुशृंगी पोलिसांच्या ताब्‍यात दिले.

विद्यार्थ्यांचे म्हणणे काय ?
काही विद्यार्थी संघटनांचा पुणेरी पगडीला विरोध आहे. ‘पुणेरी पगडी हे पेशवाईचं प्रतीक असून फुले पगडी हे शिक्षणाचं प्रतीक आहे. तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फुलेंनी अथक मेहनत घेतली. तर पुणेरी पगडीचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडीचा समावेश करण्यात यावा, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*