पुण्यात अडकलेले स्पर्धा परीक्षेचे 18 विद्यार्थी अहमदनगरला परतले

jalgaon-digital
2 Min Read

सार्वमत

पुणे (प्रतिनिधि) – पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांची रवानगी त्यांच्या गावी करण्यास सुरुवात झाली असून गुरुवारी राज्यातील पहिली बस 18 विद्यार्थ्यांना घेऊन अहमदनगर पोहोचली आहे. मात्र, पुणे शहरात सुमारे 4 ते 5 हजार विद्यार्थी पुण्यात अडकून पडले असून त्यांना घरी पाठविण्यात मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. उसतोड कामगारांना ज्या धर्तीवर आपल्या गावी पाठवण्यात आले त्या धर्तीवर आम्हालाही आमच्या गावी जाऊ द्या, अशी मागणी हे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत.

लॉकडाऊनमुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थी अडकून पडले आहेत.या विद्यार्थ्यांना सुमारे 45 दिवसातहून अधिक कालावधीपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोफत फूड पॅकेट वितरण करण्यात आले. परंतु, लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना पैसे संपल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अवघड झाले. त्यामुळे एमपीएससी स्टुडंट्स राइट्स या संघटनेसह विविध विद्यार्थी संघटनांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडावे, अशी मागणी केली होती .

त्याचप्रमाणे बुधवारी विद्यार्थ्यांची मागणी ट्विटर ट्रेंडद्वारे शासनापर्यंत पोहचविण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाकडे सृजन फाउंडेशन व एमपीएससी स्टुडंट्स राइट्स संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी 18 विद्यार्थी स्वारगेट बस स्थानकातून अहमदनगर जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यासाठी स्टडी सर्कल चे आनंद पाटील यांनी आर्थिक सहकार्य केले.

काही दिवसांपूर्वी 2 हजार 300 विद्यार्थ्यांची यादी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली होती. सर्वाधिक कोरोना प्रभावित क्षेत्र वगळून इतर परिसरातील 43 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना गुरूवारी सकाळी 11 वाजता स्वारगेट बस स्थानकावर उपस्थित राहण्याबाबत कल्पना देण्यात आली होती. परंतु, अनेक विद्यार्थी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे अठरा विद्यार्थ्यांना स्वारगेट बस स्थानकातून बसमधून पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतर् जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना अहमदनगरला पाठविले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *