Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

पुणे-नागपूर एसी हमसफर एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार!

Share
जळगाव । आठवड्यातून एक दिवस असलेली पुणे-नागपूर सुपरफास्ट हमसफर एक्स्प्रेस गुरुवार, 7 मार्चपासून रोज धावणार आहे. 11417 ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवरून रात्री दहा वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी दीड वाजता नागपूरला पोहोचेल. तर नागपूरहून दुपारी तीन वाजता सुटणारी 11418 ट्रेन पुढल्या दिवशी सकाळी आठ वाजता पुण्यात पोहोचेल.

राजधानी एक्स्प्रेसचे सुधारित उन्नत रूप असलेल्या या ट्रेनचे सर्व 13 डबे थ्री टायर एसी असतील. मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने या ट्रेनसाठी नियमित ऑनलाइन आरक्षण 4 मार्चपासून सुरू झाल्याचे कळविले आहे. 15 तास 55 मिनिटात 887 किलोमीटर कापणारी ही सुपरफास्ट ट्रेनला दौंड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबे आहेत. पुण्याहून रात्री 10 वाजता निघणारी ट्रेन पहाटे 3 वाजून 35 मिनिटांनी मनमाड, 4 वाजून 40 मिनिटांनी चाळीसगाव, सकाळी साडेसहाला भुसावळ तर 8 वाजून 40 मिनिटांनी अकोला यथे पोहोचेल.

नागपूरहून दुपारी 3 वाजता सुटणारी ट्रेन सायंकाळी 7 वाजता अकोला, रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी भुसावळ, रात्री सव्वा अकरा वाजता चाळीसगाव तर रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी मनमाड येथे पोहोचेल. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ लिंकद्वारे या रेल्वेला नुकताच हिरवा झेंडा दाखविला. त्यानिमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या गाडीत आधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहे. गाडीच्या बाह्यभागावर व्हिनेलमधील निळ्या रंगाचा वापर केला आहे. गाडीत प्रवेश करतानाच त्यातील बर्थपासून पडद्यापर्यंत सर्व बाबी लक्ष वेधून घेतात. डब्यांमध्ये चार्जिंग पॉइंट्स असून प्रत्येक बर्थवर वाचनासाठी बल्ब पुरविण्यात आले आहेत. आगीचा अ‍ॅलर्ट, जीपीएसचा वापर, डब्यात कचराकुंडी, प्रत्येक बर्थवर चार्जिंगसाठी पॉइंट्स, वरच्या बर्थवर जाण्यासाठी आधार देणारे दोर अशा विविध सुविधा या गाडीत देण्यात आल्या आहेत.

हमसफर गाडीच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असून जीपीएस तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात आला आहे. डब्यात धूर, आगीची पूर्वसूचना देणारे अलार्म असून डब्याच्या प्रवेशद्वारांजवळ माहिती देण्यासाठी स्क्रीन आहेत. या गाडीत कुठेही आग लागल्यास गार्डला तात्काळ त्याची माहिती मिळण्याची व्यवस्था केली आहे. उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.

या गाडीचे सर्व डबे एलएचबी श्रेणीचे असून एका डब्यातून दुसऱया डब्यात जाण्यासाठी गँग वे असणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आरओ, बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत. अंध प्रवाशांच्या सुविधेसाठी बेसिन तसेच आसनांजवळ ब्रेल लिपीत सूचना असतील. प्रसाधनगृहात मुलांसाठी स्वतंत्र छोटे कूप तसेच पाण्याच्या नियोजनासाठी सेन्सर असतील. या गाडीच्या एका कोचमध्ये 100 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. त्यामुळे 13 कोचच्या या एका गाडीत 1300 प्रवासी सामावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गाडीतून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!