पुणे विभागात 563 तर नगर जिल्ह्यात केवळ 83 टन रेशीम कोषाचे उत्पादन

0

भेंडा (वार्ताहर)– पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाअंतर्गत पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात 8 लाख 18 हजार 528 रेशीम अंडीपुंजाचा परवठा रेशीम उत्पादकांना करण्यात आला होता. त्यापैकी रेशीम उत्पादकांनी 563 मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले आहे. त्यातून रेशीम उत्पादकांना सरासरी 20 ते 22 कोटी रूपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. यात पुणे जिल्हा हा अव्वल असल्याचे प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.
पुणे प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, तर कोकणातील ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. कार्यालयाअंतर्गत 10 जिल्ह्यात रेशीम शेती शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची साथ रेशीम कोष उत्पादनाला मिळाल्यामुळे शेतकरी रेशीम उत्पादनाकडे वळला आहे.
रेशीम शेती ही इतर पिकांपेक्षा निश्‍चितच फायदेशीर ठरत असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत प्रति एकरी 80 ते 120 किलोपर्यत कोष उत्पादन घेत आहे. शेतकर्‍यांना रेशीम शेतीतून एकरी सुमारे 30 ते 40 हजार रुपये उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित होत आहे. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोष खरेदीसाठी कर्नाटकातील बंगलोर, रामनगर येथील केंद्रासाठी व्यापारी थेट शेतकर्‍यांच्या शेतामधून रेशीम कोष खरेदी करत आहेत. काही शेतकरी व्यापार्‍यांना थेट विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रतीकिलो सरासरी 300 ते 450 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जोड मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना तुतीच्या लागवडीसोबतच किटक संगोपनासाठी आवश्यक असलेले बांधकाम करणे सहज सुलभ झाले आहे. मनरेगा अंतर्गत लाभार्थी शेतकरी ही संपूर्ण कामे करत असल्यामुळे रेशीम शेती अधिक फायदेशीर ठरली आहे.

मागासवर्गीय शेतकर्‍यांना शेतीची कमाल मर्यादा नसून इतर मागासवर्गीय शेतकर्‍यांना पाच एकरापर्यंत जमीन तयार करण्यापासून अंडकोष निर्मितीपर्यंत संपूर्ण सवलत दिली जाते. 3 वर्षांसाठी नावासमोर प्रतिदिन 201 रुपयाप्रमाणे रोजंदारी उपलब्ध होते. एकूण 3 वर्षांसाठी 1 लाख 92 हजार रुपये साहित्य व कीटक संगोपन गृहासाठी अनुदानाचा यामध्ये समावेश असतो. त्यामुळे अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

रेशीम शेती पश्‍चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची साथ रेशीम कोष उत्पादनाला मिळाल्यामुळे शेतकरी रेशीम उत्पादनाकडे वळला आहे.
-पी. एन. चलपेलवार
प्रादेशिक सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे

जिल्हानिहाय तुती क्षेत्र
व कोष उत्पादन
जिल्हा तुती क्षेत्र कोष उत्पादन
एकर मे टन
पुणे 346 107
सांगली 249 63
सातारा 357 91
सोलापूर 327 107
कोल्हापूर 203 83
नगर 211 83
नाशिक 110 16
धुळे 14 03
नंदुरबार 03 06
ठाणे 31 04

LEAVE A REPLY

*