Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज

पुणे : अत्यवस्थ महिलेसह दोघी कोरोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील दोन कोरोनाग्रस्त महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत. महिलांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. एक महिला नायडू रुग्णालयात, तर दुसरी खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. खाजगी रुग्णालयातील महिला अत्यवस्थ होती, मात्र उपचारानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

दोन्ही कोरोनामुक्त महिलांना आज (बुधवार 1 एप्रिल) डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर दोन्ही महिलांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवलं जाणार आहे. पुण्यात आतापर्यंत नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या दोन महिलांमध्ये परदेशवारी न करता कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि गेल्या 14 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या 41 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

- Advertisement -

या महिलेचा व्हेंटिलेटरही काढण्यात आला असून, तिची प्रकृती वेगाने सुधारत आहे. त्यामुळे कोरोनामुळे थेट मरणाच्या दारात पोहोचलेल्या अंगणवाडी सेविकेने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूवर विजय मिळविला आहे. सिंहगड परिसरातील एका महिलेला 19 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

धक्कादायक म्हणजे या महिलेने कोणतीही परदेशवारी केली नसल्याचे, तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले नसतानाही तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यापूर्वीच म्हणजे दि. 6 मार्चपासून या महिलेस कोरोनाची लक्षणे होती. मात्र, कुठलीही परदेशवारी नाही, अथवा परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या ती संपर्कात आली नसल्याने हा वातावरणातील बदलामुळे येणारा ताप असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

तिला निमोनिया झाला असल्याचे आढळून आले होते. डॉक्टरांनी कोरोनाच्या तपासणीसाठी तिच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला पाठविले. मात्र, तो अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा दि. 19 मार्चला या महिलेच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला पाठवून कोरोनाची चाचणी करण्यात आली. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ही महिला भारती रुग्णालयात दाखल केल्यापासून अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवरच होती. तिची प्रकृती खालावत चालली होती. धक्कादायक म्हणजे कोणतीही परदेशवारी न करता तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा चक्रावून गेली होती. तिच्या संपर्कात आलेल्या वेल्हा परिसरातील संपूर्ण गावालाच क्वारंटाईन करण्यात आले होते.

गेल्या 14 दिवसांपासून मृत्यूशी लढा देणार्‍या या अंगणवाडी महिला सेविकेचा धोका पूर्णपणे टळला आहे. या महिलेचा सोमवारी पाठविण्यात आलेला कोरोनाचा पहिला चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर मंगळवारी पाठविण्यात आलेली दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. तसेच तिचा व्हेंटिलेटर काढून तिला अतिदक्षता विभागातूनही बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. या महिलेला पूर्णपणे बरे वाटल्यानंतर डॉक्टरांच्या सुचनेनुसार रुग्णालयातून घरी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा 30 मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या रुग्णावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्यानंतर पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 36 रुग्ण होते, त्यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड परिसरातही 11 मार्चपासून तब्बल 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील 9 जण उपचारानंतर घरी परतले आहेत.

महापालिका करणार उपचाराचा खर्च – दरम्यान, भारती रुग्णालयात उपचार घेणार्‍या महिलेच्या उपचाराचा खर्च महापालिका करणार आहे. या महिलेच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यानुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधीची घोषणा केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या