Type to search

Featured सार्वमत

पुजा कुर्‍हे मृत्यूप्रकरणी महावितरण अडचणीत

Share

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आझाद प्रतिष्ठानची दोषींवर कारवाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या पुजा कुर्‍हे प्रकरण महावितरणच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे. शिवसेनेसह चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठान या प्रकरणी आक्रमक झाले असून, दोषी अधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम आदींनी सांगळे यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केली. विजेच्या झटक्याने मृत झालेल्या पुजा कुर्‍हे यांच्या वडिलांनी आणि तेथील नागरिकांनी परिसरात वीज प्रवाह उतरत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे केल्या होत्या. मात्र संबंधित भागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

कुर्‍हे हिचा मृत्यू केवळ महावितरणच्या दुर्लक्षामुळेच झाला असून, तिच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शहर व परिसरात वादळ वार्‍याने अचानक वीज पुरवठा खंडित होतो. तो पुन्हा कधी पूर्ववत होणार, याबाबत विचारणा करण्यास जाणार्‍या नागरिकांशी कर्मचारी व्यवस्थित बोलत नाहीत. फोन घेत नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत कोणाला संपर्क करायचा, याबाबत महावितरणने कोणतेही मोबाईल क्रमांक किंवा अधिकार्‍यांची नावे जाहीर केलेली नाहीत. या संदर्भातही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

याच प्रकरणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानेही महावितरणच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी केली. तसेच भाजप व चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठानच्यावतीने अधिक्षक अभियंता सांगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर बोचूघोळ, दत्ता गाडळकर, अभय बडे, राजेंद्र सातपुते, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. अमोल थोरात, अ‍ॅड. दिपक वाऊत्रे, विजय मडके आदि उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर पोलिस मुख्यालय वसाहतीत राहणार्‍या पुजा सुनिल कुर्‍हे हिच्या मृत्यूस महावितरण जबाबदार आहे. पावसामुळे घरावरील पत्रे व भिंतीमध्ये वीज प्रवाह उतरल्याने हा प्रकार घडला. या संदर्भात चार दिवसांपूर्वी महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेतली न गेल्याने केवळ हलगर्जीपणामुळे हा बळी गेला आहे. यास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा भाजप व चंद्रशेखर आजाद युवा प्रतिष्ठानतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच या प्रकरणी न्यायालयात दाद मागावी लागेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!