महाशिवआघाडी एकत्रित येऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण
Share

मुंबई- शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्यात बिगर भाजपा सरकार बनविण्याचा प्रयत्न सुरू झालेला असतानाच या प्रयत्नांना भाजपकडून खो घातल्या जात आहे. सत्तास्थापनेची खलबतं सुरु असताना आता आरोपांच्या फैरी सुरू आहेत. शिवसेनेसोबत आमची आघाडी होऊ नये म्हणून भाजपा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला आहे.
राज्यात सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसकडून कोणताही उशीर झाला नसल्याचा पुनरुच्चारही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेना एनडीएचा घटक पक्ष असल्याने तोपर्यंत चर्चा करणं योग्य नव्हतं. त्यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत व्यापक चर्चा केली.
शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी उशीर झाला होता. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे जाऊ असं शरद पवार यांनीही स्पष्ट केले. शरद पवार यांनी सोनिया गांधींशीही यासंदर्भात चर्चा केली असंही चव्हाण यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने वेळकाढूपणा केला असं म्हणण्यात तथ्य नसल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.