Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ; गेल्या सात महिन्यांत ८७ कोटी 67 लाख रुपये मनपाच्या तिजोरीत

Share

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून विविध परवानगीच्या माध्यमातून सव्वा सहा महिन्यात विक्रमी असा 200 कोटींचा महसूल वसूल केल्यानंतर आता कर विभागाकडून घरपट्टी वसुलीच्या गेल्या सात महिन्यांत 87.67 कोटी रुपयांच्या महसुलाची महापालिकेच्या तिजोरीत भर घातली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने नुकत्याच राबविलेल्या अभय योजनेत तब्बल 28 कोटींच्यावर घरपट्टी वसूल केली आहे.

महापालिका प्रशासनाने यंदा सन 2019-20 या वर्षात कर विभागाला घरपट्टीच्या माध्यमातून 150 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानुसार या विभागाच्या घरपट्टी वसुलीला नवीन आर्थिक वर्षात आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे ब्रेक लागला होता. मात्र गेल्या 16 सप्टेंबरपासून प्रशासनाने तीन टप्प्यात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्याचे काम केले आहे.

यात 16 ते 30 सप्टेंबर 2019 या दरम्यान घरपट्टीच्या थकबाकीसह संपूर्ण रक्कम एक रकमी भरल्यास 75 टक्के सवलत, 1 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान घरपट्टीच्या थकबाकीसह संपूर्ण रक्कम एक रकमी भरल्यास 50 टक्के सवलत आणि 11 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान घरपट्टीच्या थकबाकीसह संपूर्ण रक्कम एक रकमी भरल्यास 25 टक्के सवलत असे अभय योजनेचे स्वरुप होते.

या कालावधीत घरपट्टीचे थकबाकीदार असलेल्या मालकांनी योजनेचा लाभ घेत एकूण 28 कोटींच्यावर थकबाकी भरल्याने मोठा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

या अभय योजनेतील वसूल घरपट्टीसह 1 एप्रिल ते 31 ऑक्टाेंंबर 2019 या कालावधीत महापालिकेला 87.67 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षात 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2018 याच काळात केवळ 86 कोटींचा महसूल जमा झाला होता.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात या विभागातील कर्मचारी मतदानाकरिता जिल्हा प्रशासनाकडे वर्ग होत असल्याने कर वसुलीच्या कामांना मर्यादा येतात. अशाही स्थितीत कर विभागाकडून यंदा कर वसुलीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून यंदाचे 150 कोटींचे उद्दिष्ट पुर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!