विनाअनुदानितचे प्राध्यापक जाणार बेमुदत संपावर

0

विधिमंडळावर मोर्चा, आमदार होणार सहभागी

अहमदनगर – राज्यात सुमारे तीन हजार 200 विनाअनुदान तत्त्वावर सुरू असलेली कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये सुमारे 22 हजार 500 प्राध्यापक अध्यापनाचे काम करत आहेत. परंतु गेल्या 16 ते 17 वर्षांपासून ते बिनपगारी आहेत. या प्राध्यापकांना पगार देण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी दि. 11 डिसेंबर पासून महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्यात येणार असून नागपूर येथे विधानभवनावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षकांच्या संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. यामध्ये शिक्षक व पदवीधर आमदार सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्यावतीने याबाबतचे निवेदन शिक्षण विभागाला दिले आहे. राज्यातील जवळपास तीन हजार 200 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी तेराशे ते चौदाशे महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. मात्र, अद्यापही त्यांना अनुदानास पात्र म्हणून घोषित केले नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 11 डिसेंबरपासून महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
त्याचबरोबर राज्यातील जवळपास 22 हजार शिक्षक विधानभवनावर होणार्‍या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. संघटनेच्यावतीने राज्यभर जवळपास 206 वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली आहेत. मात्र, शासनाने अद्यापही कोणताही निर्णय न घेता केवळ आश्‍वासने दिली आहेत. त्याचा फटका राज्यातील या प्राध्यापकांना बसत आहे. महाविद्यालये बंद ठेवल्याने होणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस शासन जबाबदार राहील, असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

11 डिसेंबर रोजी काढल्या जाणार्‍या मोर्चामध्ये आमदार दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, ना. गो. गाणार, श्रीकांत देशपांडे, भगवान साळुंखे, कपिल पाटील, आमदार सुधीर तांबे, बाळाराम पाटील उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*