Thursday, May 2, 2024
Homeब्लॉगदमनकारी कायदे आणि स्वातंत्र्ययुद्ध...

दमनकारी कायदे आणि स्वातंत्र्ययुद्ध…

स्वातंत्र्य मानवच नव्हे ,तर प्रत्येक सजिवाचा श्वास असतो. भौतिक परिस्थिती आणि स्वातंत्र्य भावना यांच्यात दुरान्वयाने संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. साखळदंड सोन्याचे

आहेत किंवा खाण्यासाठी मोत्याचे दाणे आहेत. हे स्वातंत्र्यापुढे कवडीमोल असते. लोकशाही राज्यपद्धती मानवी स्वातंत्र्याची आदर्श अवस्था समजली जाते. लोकशाहीच्या मुखवटयाखाली हुकूमशाही वावरत असते. हे देखील नाकारता येत नाही. असे असले तरी लोकशाहीच्या मुखवटयापायी हुकूमशाहीला आवर घालणे शक्य असते.

- Advertisement -

भारतीय राज्यघटनेने एका अत्यंत आदर्श व प्रगल्भ लोकशाहीच्या पायावर स्वतंत्र भारताला उभे केले आहे. संविधानाला अपेक्षित लोकशाही शंभर टक्के अवतरली नाही. हे विदारक वास्तव आहे. एक मात्र तेवढेच खरे आहे की त्यामुळे स्वतंत्र भारतातील हुकूमशाहीच्या अनेक लाटा आजवर भारतीय जनतेने परतवलेल्या आहेत. संसदीय लोकशाहीचा पहिला प्रयोग करणा-या इंग्लंडला इतरांच्या बाबतीत प्रत्येक सजिवाचा मूलभूत अधिकार असणा-या स्वातंत्र्याचा सोयीस्कर विसर पडला. भारताप्रमाणेच जगाने ते अनुभवले. इंग्लंडचा इतिहास पाहता आपत्ती आणि महानता अशा दोन्ही स्थितींचा अनुभव या देशाने घेतला.

आपत्तीच्या प्रसंगी त्यांचे धैर्य आणि साहस यत्किंचितही कमी झाले नाही. इतिहासातील प्रत्येक संघर्षाला इंग्रंजांनी अत्यंत स्वाभाविकपणे आणि लीलया तोंड दिले. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना देखील अत्यंत तीव्र होती. मात्र इतरांच्या स्वातंत्र्याचे निदर्यपणे दमन करण्याची किंमत त्यांना चूकवावी लागली. भारताप्रमाणे अमेरिकेच्या बातीत नेमके हेच त्यांच्याकडून घडले. अमेरिकेला चिरडण्यासाठी इंग्रंजांनी आपल्या सर्व पद्धती व परंपरा यांना मूठमाती दिली. अमेरिका आपणच निर्माण केलेला देश आहे,म्हणजे तेथे गेलेले आपलेच स्वजातीय आपले गुलाम आहेत.

ही भावना ब्रिटिश सत्ताधा-यांच्या मनात बळावली. एखादयाला जीवनात उभे करण्यास सहकार्य करणा-या माणसाला त्याच्या मदतीने उभा राहिलेला,त्याच्या विरोधात उभा राहिल्यास जेवढा राग येतो,तेवढा शत्रुच्या विरोधाचा देखील येत नाही. तेंव्हा तो त्याच्या आश्रिताला चिरडण्यात अमानवियतेच्या सर्व सीमा ओलांडतो. जेवढया कदाचित शत्रुच्या बाबतीत देखील ओलांडत नाही. हीच आदिम मानवी प्रवृत्ती अमेरिकन जनतेविषयी इंग्रंजांची उफाळून आली. तिथेच सारे मुसळ केरात गेले. आपल्या प्रमाणेच दुस-यालाही त्याचे स्वातंत्र्य प्रिय आहे. हे अमेरिकेच्या संदर्भात इंग्रंज मान्य करू शकले नाही. इंग्लंड आणि अमेरिका यांचा संघर्ष हा जेवढा राजकिय होता,तेवढाच तो सांस्कृतिक देखील होता. अमेरिका ही इंग्लंडने अनोळखी भूखंडावर निर्माण केलेली वसाहत असली आणि अमेरिकन समाजात इंग्रंज लोकसंख्या तुलनेने अधिक असली,तरी १५० वर्षांपूर्वी पोहचलेल्या इंग्रंजांच्या वंशजांची ती मातृभूमी झाली होती. इंग्लंडशी असलेले त्यांचे नाते कालौघात अत्यंत क्षीण झाले होते. त्याचबरोबर युरोपातील इतर देशातील लोकही आता अमेरिकेच्या भूमीवर स्थिरावले होते. बहुसंख्य ब्रिटिश आणि त्यांचा मिळून एक नवीनच समाज व संस्कृती निर्माण झालेली होती. सगळयांचे वेगळेपण एकमेकात मिसळून फक्त अमेरिकन हीच त्यांची एकजिनसी ओळख होती.

इंग्लंडमधील सत्ताधारी अमेरिकेची निर्मिती होत असतांना साम्राज्यविस्तारात मग्न होते. त्याचबरोबर अमेरिका म्हणजे आपल्या साम्राज्याचा महत्वपूर्ण असा १३ वसाहतींचा भाग आहे. त्यामुळे मातृभूमीचे हित म्हणजे अमेरिकन वसाहतींचे हित होय. अशी धारणा संपूर्ण इंग्लंडची झालेली होती. मात्र इंग्लंडपासून सुमारे तीन हजार सागरी मैलांवर असणारा अमेरिका वेगळाच घडत होता. आपल्या मातृभूमी पेक्षा अधिक वेगाने तेथे बदल घडत होते. राजकिय अधिकांराविषयी अमेरिकन जनता आपल्या देशबांधवांच्या तुलनेत अधिक प्रगल्भ झालेली होती. इंग्लंड आणि तिथला समाज स्थितीशील होत होता,तर अमेरिकन समाज गतीमान झालेला होता. त्यांच्या पूर्वजांनी दाखवलेले साहस आणि बलिदान यांच्या पायावर हे नवे जग उभे होते. कोणत्याही जुनाट-बुरसटलेल्या रूढी,परंपरा,धर्ममान्यता,कर्मकांड,वांशिक-प्रादेशिक अस्मिता इत्यादींचे जळमटात हा समाज गुरफटलेला नव्हता. त्यांची पाटी कोरी होती. ते लिहितील तोच तिथला कायदा आणि तोच धर्म होणार होता. अमेरिकन समजाला त्यांच्या नव्या जगात नव्या युगाचा प्रारंभ करायचा होता. आता त्यांच्याकडे त्यांच्या आशा-आकांक्षा होत्या,स्वप्न होता,त्यांच्या म्हणून काही गरजा होत्या.

तसेच हे सर्व प्रत्यक्षात आणण्याचा सृजनात्मक उत्साह होता. अमेरिकन वसाहतीमध्ये झालेल्या या परिवर्तनाचा वेध घेण्यात ब्रिटिश सत्ताधीश असमर्थ ठरले. अमेरिकन समाज स्वतःच्या स्वातंत्र्याची आस निर्भिडपणे व्यक्त करू लागला तेंव्हा ब्रिटिश सत्ताधा-यांनी कर्मठपणा स्वीकारला. आपल्या साम्राज्यवादी धोरणाचा अवलंब करण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांना एका गोष्टीचा विसर पडला की अमेरिका त्यांनी निर्माण केलेला देश होता. इतर देशांप्रमाणे त्याला हाताळणे योग्य नाही. ब्रिटनची राजसत्ता द्रष्टी व जाणकार असती तर आज अमेरिका नाही तर इंग्लंड म्हणूणच हा भूभाग जगाच्या नकाशात ओळखला गेला असता. परंतु राजसत्तेने आपल्या अज्ञानापायी दरबारी मंत्र्यांच्या बुद्धीने चालण्यास सुरवात केली आणि तिच अमेरिकेतील त्यांच्या अंताची सुरवात होती.

सत्ताधारी अज्ञान असल्यामुळे मंत्र्यांनी सुचवलेले धोरण त्यांना न्यायसंगत व तर्कसंगत वाटत होते. त्यांनी दरबा-यांच्या डोक्याने अशी पावले उचली की अतंतः ती घातक ठरली. सत्ताधा-यांनी सर्वप्रथम अमेरिकेतील वसाहतींमधील विधानसभा दुर्बल केल्या. विधानसभांऐवजी कार्यकारीमंडळ नावच्या कळसुत्री बाहुलीकडून वसाहतींमधील कारभार चालवला जाऊ लागला. शासकीय व्यवस्थेत बदल करून व्यापारसंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आला. वसाहतींच्या सुरक्षेच्या नावाखाली स्थायी स्वरूपाच्या लष्करी छावण्या निर्माण करण्यात आल्या. त्यांचा खरा हेतू अमेरिकन जनतेला चिरडण्याचा होता. हे सर्व केले जात होत ब्रिटनच्या संसदेत. संसदीय लोकशाहीच्या बुरख्याखाली राजेशाही आपली मनमर्जी करत होती. १७५६ ते १७६३ या सात वर्षाच्या कालावधीत इंग्लंड व फ्रांसमध्ये युद्ध झाले. ब्रिटिश सत्ताधा-यांच्या मते या युद्धात अमेरिकन वसाहतींनी संपत्ती व मनुष्यबळ या दोन्ही स्तरावर योग्य सहाकार्य केले नाही. असा दृष्टिकोन झाल्याने सत्ताधा-यांची खफा मर्जीस प्रारंभ झाला. तसेच हा इंग्लंड आणि अमेरिकेतील धुसफुसीचा प्रारंभ होता. ही फट सांधण्याचा प्रयत्न होण्याऐवजी रुंदावतच गेली. सत्तेच्या मस्तीत ब्रिटिश सत्ताधा-यांना शहाणपणा सुचला नाही. अमेरिकेला केवळ आपल्या कच्च्या मालाची खाण समजणे देखील इंग्लंडला भोवले. अमेरिकेत उत्पादन होणा-या कच्च्या मालावर इंग्लंडचा हक्क आणि अमेरिका ही इंग्लंडच्या पक्का मालाची हक्काची बाजारपेठ. हे धोरण सत्ताधारी राबवत होते.

त्यांच्या मागे इंग्लंडमधील भांडवलदार होतेच. दोन्ही बाजूने अमेरिका लूटली जात होती. अशी लूट बिनदिक्कत चालावी यासाठी इंग्लंड अमेरिकेतील वसाहतींवर जास्तीत जास्त नियंत्रण आणि बंधने लादत होते. जनकल्याणकारी कायदयांच्या नावाखाली ही लूट योजना कार्यान्वयित करण्यात येत होती. स्वातंत्र्याचे धुमारे फुटू लागलेल्या अमेरिकन जनतेला ही नियंत्रणे व बंधेन जाचक वाटू लागली. अशातच सत्ताधारी ‘स्टॅम्प अॅक्ट’ नावाचा कायदा घेऊन आले. हा कायदयाने अमेरिकेवर लादण्यात आलेल्या कागदावरच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास लिहिण्यात आला.

प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या