अहमदनगर | प्रा. डॉ. गीता सतीश राऊत : प्रज्ञावंत शिक्षणसावित्री

0

देवळाली प्रवरा, ता.राहुरी
संस्था – राहुरी रुरल वुमेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन
कार्य – शिक्षण संस्थेची उभारणी. देश-विदेशांतील शिक्षण प्रवाहांचा अभ्यास, 
गट : शिक्षण

अहमदनगर जिल्ह्यात वाढलेल्या या शिक्षणाच्या चळवळीला पोषक खतपाणी घालण्याचे काम जिल्ह्यातील अनेक धुरिणांनी केले आहे. त्यात अनेक महिलांचाही सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीचा इतिहास रेखाटायचा असेल तर त्यात राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील राहुरी रुरल वुमेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्थेच्या सर्वेसर्वा प्रा. डॉ. गीता सतीश राऊत यांची नोंद घ्यावी लागेल.

साधारण 15 वर्षांपूर्वी राहुरी फॅक्टरी येथील अवघ्या सात लहान बालकांना सोबत घेऊन देवळाली प्रवरा येथील पाटबंधारे विश्रामगृहानजीकच्या आदिनाथ मंदिरात शाळा सुरू करण्याचा संकल्प डॉ. गीता राऊत यांनी केला. त्यानंतर 25 वर्ष सतत मेहनत, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या शिदोरीवर अत्यंत कष्टातून त्यांनी ही शिक्षणाची वेल फुलविली.

एक महिला शैक्षणिक क्षेत्रात किती असाधारण काम उभे करू शकते, याचा ज्वलंत प्रत्यय त्यांच्या आजवरच्या कार्यातून आला आहे. आज राहुरी फॅक्टरी येथील उजाड बनलेल्या माळरानावर हा शिक्षणाचा वटवृक्ष अनेक विद्यार्थ्यांना साक्षरतेची सावली देत आधारवड बनून समर्थपणे उभा राहिला आहे. पिंपळगाव फुणगी या अगदी 50 उंबरठे असलेल्या गावचे सासर असलेल्या डॉ. गीता राऊत यांचा शैक्षणिक प्रवास थक्क करून सोडणारा आहे.

पिंपळगाव फुणगी ते थेट चीन आणि अमेरिकेपर्यंत आपल्या कर्तृत्वाची झलक दाखविणार्‍या डॉ. राऊत यांचे कार्य दीपस्तंभासारखे ठरले आहे. सन 1987-88 मध्ये एक शिक्षिका म्हणून आपल्या कार्याचा त्यांनी श्रीगणेशा केला. मात्र, केवळ पगारापुरते काम न करता ग्रामीण भागातील विशेषतः राहुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना जगाच्या स्पर्धेत उतरून यशस्वी करण्याची खूणगाठ मनाशी बांधली. सन 1991 साली राहुरी रुरल वुमेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्थेची स्थापना करून शैक्षणिक पर्वाला सुरुवात केली.

संस्थेच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल, गायत्री ज्युनिअर कॉलेज, गायत्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू करून यातून 90 टक्के ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य आजतागायत सुरू ठेवले आहे. या संस्थेतून शिक्षणाचा मूळ पाया भक्कम झाल्याने संस्थेचे अनेक विद्यार्थी आज देशात व परदेशात उच्चपदावर कार्यरत झाले आहेत. शिक्षण संस्थेचे विद्यालये चालविताना केवळ व्यावसायिक धोरण न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला काय आवश्यक आहे? याचा विचार डॉ. राऊत यांनी नेहमीच केला आहे.

नगर जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या 80 शाळांमधील सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांचा सर्व्हे करून ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे परिपूर्ण ज्ञान कसे अवगत करता येईल, यासाठी त्यांनी एक अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार केला. विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच स्वतःही शिक्षण घेण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. एमए (इंग्रजी), एमए (भूगोल), एमएड, एलएलबी यासह त्यांनी पीएचडीची पदवीही प्राप्त केली आहे.

आपल्याजवळ असलेले ज्ञान दडवून न ठेवता ते वाटत रहा, म्हणजे, आपल्या ज्ञानामध्ये आणखी वाढ होईल, ही भावना कायम ठेवणार्‍या डॉ. गीता राऊत यांच्याकडे असलेल्या ज्ञानाची, कौशल्याची व बुद्धीमत्तेची झलक नेहमीच दिसून आली आहे. राहुरी फॅक्टरी, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता देशात व विदेशांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी केलेले सादरीकरण शिक्षणतज्ज्ञांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

चीन, रशिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, हंगेरी या देशांमध्ये जाऊन त्यांनी तेथील शिक्षण पद्धतीचाही अभ्यास केला. तेथील शाळांना भेटी देऊन शालेेय पद्धती, अभ्यासक्रम, व्यवस्थापन, शिस्त व स्वच्छता या गोष्टींचा अभ्यास केला. सन 2015-16 मध्ये साऊथ कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये व सन 2017 मध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठात त्यांनी इंग्रजी विषयावर सादरीकरण केले.

श्रीरामपूर, पुणे विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ, नागपूर, अहमदाबाद याठिकाणीही डॉ. राऊत यांनी विविध शैक्षणिक विषयांवर सादरीकरण केले. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक कार्यशाळेत सहभाग घेतला आहे.
डॉ. राऊत यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत अनेक सामाजिक संघटनांनी त्यांचा वेळोवेळी गौरव केला आहे.

इण्डस् फाउंडेशन या अमेरिकेतील संस्थेमार्फत जानेवारी 2013 मध्ये ‘इम्मीनेन्ट एज्युकेशिनिस्ट इन इंडिया’ या पुरस्काराने हैदराबाद येथे त्यांना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड अडथळ्यांची शर्यत पार करून संघर्ष करून डॉ. राऊत या साक्षरता वाढीला मोठा हातभार लावत आहेत.

LEAVE A REPLY

*