श्रीरामपुरात बर्फाच्या कारखान्यात गुटख्याची निर्मिती

0

41 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक

श्रीरामपूर/अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरात संजयनगर परिसरात बर्फाच्या कारखान्यात गुटख्याची निर्मिती केली जात होती. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली होती.

त्यानुसार सापळा रचून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 41 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून तो अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

युसूफ उत्तम पटेल, चंद्रशेखर बसवाचारी व रफीक गफ्फार मेमन या तिघांना आरोपी करण्यात आले आहे.
सोमवारी (दि.9) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना श्रीरामपूर येथे बर्फाच्या कारखान्यात बेकायदेशीर गुटखा निर्माण केला जात असल्याची माहिती मिळाली होती.

शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना चौकशीचे आदेश देऊन घटनास्थळी सापळा रचण्यास सांगितला. पवार यांचे पथक श्रीरामपूर येथील संजयनगर परिसरात गेले असता. त्यातील काही कर्मचार्‍यांनी बर्फाच्या कारखान्यात जाऊन चौकशी केली. बाहेरुन बर्फ तयार करण्याची साधने दिसली. त्यामुळे या ठिकाणी गुटखा तयार केला जात नसावा, असा पोलिसांचा समज झाला.

मात्र, पोलिसांनी आत प्रवेश करून काही वस्तुंची तपासणी केली असता याठिकाणी बेकायदा गुटखा तयार होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ या अड्ड्यावर छापा टाकून 75 पोते गुलाम नावाचा गुटखा ताब्यात घेतला.

यावेळी चंद्रशेखर बसवाचारी (रा. निलासंद्रा, बेंगलुर) यास अटक करण्यात आली. तसेच त्याच्या ताब्यातील टी. एस. 08 युडी 3375 ही ट्रक जप्त करण्यात आली. या दरम्यान, गुटखा खरेदी करण्यासाठी आलेला रफीक मेमन यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. नेहमीप्रमाणे त्यांनी उशीरा घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचे पंचनामे केले. गुटखा व काही महत्त्वाच्या वस्तुंचे नमुने ताब्याते घेऊन रात्री उशीरा श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मन्सुर सय्यद, भाऊसाहेब काळे, दिनकर नानेकर, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विजय वेठेकर, सचिन अडबल या पथकाने केली.

सुस्त प्रशासन –
अन्न व औषध प्रशासन स्वत: देखील कारवाई करत नाही. तर दुसर्‍यांनी केलेल्या कारवाईवर नाक मुरडपणा करतात. दूध भेसळ, सुगंधी तंबाखू, मावा, गुटखा अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्याकडून सखोल तपास आजवर झालेला नाही. तर त्यांच्याकडून सहआरोपीचा शोध घेण्यात आलेला नाही. कर्मचारी कमी आहेत. आशी बोंब ठोकून हात वर केले जातात. त्यांना पोलिसांना तपासाचे आदेश देण्याची आदेश आहेत. मात्र असा एकही आदेश त्यांच्याकडून काढला जात नाही. त्यामुळे बेकायदेशीर चालणारी व्यवस्था मोडित काढण्यात या विभागाला स्वारस्य नाही. असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला गुटखा हा राहाता व श्रीरामपूर या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वितरीत केला जात असल्याची माहिती समोर आली. सकाळी शांतता व रात्रीतून मालाचे वितरण केले जात होते. तसेच स्थानिक पोलिसांचे गुटखा किंगसोबत ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याचे देखील बोलेले जात होते. त्यामुळे इतकी मोठी गुटखा उलाढाल श्रीरामपुरात सुरू असताना स्थानिक पोलीस काय करतात? त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

 

 

LEAVE A REPLY

*