Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेश‘रोगप्रतिकारशक्ती’साठी वनस्पतींपासून औषधांची निर्मिती करा ; आयुष मंत्रालयाचे राज्यांना आवाहन

‘रोगप्रतिकारशक्ती’साठी वनस्पतींपासून औषधांची निर्मिती करा ; आयुष मंत्रालयाचे राज्यांना आवाहन

सार्वमत

नवी दिल्ली – करोनाशी लढण्यासाठी देशातील राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर करुन व्यावसायिक तत्वावर औषधांची निर्मिती कारावी असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्रालयाने केले आहे. तसेच केंद्र सरकारतर्फे राज्यांना औषधी वनस्पतींची निर्मिती करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

जगभरात सध्या करोनावर लस शोधण्याचे उपाय सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा, सोवा रिग्पा आणि होमियोपॅथी अंतर्गत येणार्‍या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने पर्यायी औषध तयार करण्याचा सल्ला दिला होता. आता करोनाशी लढा देत असताना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज प्रत्येकाला आहे त्या अनुषंगाने या औषधांची निर्मिती व्हावी, असे मत आयुष मंत्रालयाने या मार्गदर्शक तत्वांद्वारे केले आहे.

तुळशीची पाने, दालचिनीची साल, सुंथी (झिंगिबर ऑफिनानेल) आणि कृष्णा मेरीच (पायपर निग्राम) आदीं घटकांच्या योग्य प्रमाणाद्वारे हे औषध तयार करण्याचे मार्गदर्शन राज्यांना करण्यात आले आहे. हे औषध काढ्याच्या स्वरूपात उकळून घेण्यास सांगितले आहे. क्वाठ, कुडीनेर, जोशांडा नामक ही औषधे काढा म्हणून उपयुक्त ठरतील, असे आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. टी बॅग्स आणि टॅबलेट्स स्वरुपात याची विक्री केली जाऊ शकते.

आयुष मंत्रालयातर्फे निर्देशित केलेल्या पत्रात हा काढा बनवण्याची संपूर्ण पद्धत विस्तृतपणे सांगितली आहे. औषध निर्मात्यांनी भुकटी (बारीक भूसा) स्वरुपात टी बॅग किंवा लहान पाकीटात प्रत्येकी तीन ग्रॅम, अशा पद्धतीने विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, असा दावा आयुष मंत्रालयाने केला आहे. या औषधींचे उत्पादन टॅबलेट्स स्वरुपातही केले जाऊ शकते, उकळत्या पाण्यात ही गोळी टाकून त्याचा काढा दिवसातून दोनदा घेतला जाऊ शकतो, असेही या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधानांचे आवाहन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिल रोजी देशवासियांना संबोधित करताना आयुष मंत्रालयाच्या याच मार्गदर्शक तत्वांद्वारे औषधी वनस्पती बनवण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन केले होते. उकळत्या पाण्यात तुलसीपत्र, आले, हळद अशा काढ्याचे सेवन करणे, ताजे जेवण घेणे तसेच योग्य मार्गदर्शनात योगासने आणि प्राणायम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

‘काढा’ प्या –
आयुष मंत्रालयातर्फे दररोज सकाळी चवनप्राश, हर्बल टी, दिवसातून एकदा किंवा दोनदा तुळशीची पाने, दालचिनी, मिरपूड, आले आणि मनुका यांचा एकत्रित काढा, हळद घातलेले दूध पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सिद्ध पद्धतीतील चिरेट्टा चूर्ण काढ्याचा उपयोगही केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. चिरेट्टा या वनस्पतीचा वापर मधुमेहावर केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या