Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवाला घडविणाऱ्या माणसाची व्यथा!

Share

नाशिक | प्राजक्ता नागपुरे

एखाद्या डॉक्टरला त्याच्या मुलांनी डॉक्टर व्हावे असे वाटतं असते, उद्योजकांना त्यांचा व्यवसाय मुलांनी पुढे न्यावा ही अपेक्षा असते. मुलांनी वारसा पुढे चालवावा यातच बापाच्या जन्माचे सार्थक असते, हे खरे!

‘या’ वडिलांना मात्र त्यांच्या मुलांनी त्यांचा व्यवसाय न करता बाकी दुसरे काहीही करावे असे ठामपणे वाटते. इतकी अगतिकता एखाद्या माणसाच्या ठायी असावी, यासारखे दुसरे वैषम्य नाही.

असे अनेक अभागी वडील म्हणजे पेठरोड लगतच्या झोपट्टीत राहणारे मध्यप्रदेशातून आलेले अनेक मूर्तिकार. कित्येक देवांना घडविणारा हा माणूस छिन्नी हातोडा घेऊन दगड कापत जातो आणि हळू हळू ओबडधोबड दगडाला देवपण येऊ लागते. मग या देवाची दया त्याच हातांना का लाभू नये?

रस्त्यावर जगतांना अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी रोज नवा लढा या मूर्ती कारागिरांना द्यावा लागतो. दगडांना आकार देऊन सुबक, सुंदर मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांचे आयुष्य उघड्यावर पडले आहे, त्याची तमा बाळगणारा कोणीही नाही. यांच्या ना संघटना आहेत, ना कुठले राजकीय पक्ष.

कोणत्याही स्वार्थाशिवाय अनेक वर्षांपासून हे मूर्तिकार आपली कला, व्यवसाय टिकविण्यासाठी छिन्नी हातोड्याचे घाव झेलत दगडाला देवपण देत आहेत. हायवेला जागोजागी दिसणाऱ्या या कारागिरांचे पाल त्यांच्या अठराविश्वे दारिद्र्याचे दर्शन देतात. त्या पालांबाहेर मांडलेल्या देवी, गणपती, हनुमान, मरीमाय, महादेव, नंदी, दत्त यांच्या मूर्त्यांना बघून आपसूकच आपले हात जोडले जातात. मात्र या भक्तीभावात  त्यांच्या परिस्थितीचे वास्तव धूसर होते, ही खरी व्यथा.

अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या दगडी मूर्ती घडविणारे कारागीर  त्यांच्या कलेला किंमत नसल्याची खंत व्यक्त करतात. अखंड पाषाणातील एक मूर्ती घडविण्यासाठी  १५ दिवसापेक्षा अधिक काळ लागतो. त्यांच्या कार्याला पत्नी, मुलेही तशीच साथ देतात. ‘दारिद्र्याला शाप संततीचा’ या म्हणी प्रमाणे मूर्तिकारांचे कुटुंब 20 – 22 सदस्यांचे असते. त्यामुळे कोणत्याही मुलाचे भरण-पोषण, शिक्षण होऊ शकत नाही.

मुले तिसऱ्या वर्षी हातात छिन्नी हातोडा घेऊन काम शिकू लागतात. आणि हे उपेक्षेचे चक्र सुरूच राहते. ह्या मूर्तिकारांचे संपुर्ण कुटुंब भक्तांच्या ऑर्डरप्रमाणे मूर्ती घडवून देतात, अन्य वेळी जाते, खलबत्ते, उखळ, पाटा इत्यादी अन्य साहित्य दगडापासून बनवून पोटाची खळगी भरतात.

अनेकदा अखंड दगड काढताना घरावर तुळशीपत्र ठेवावे लागते. मूर्ती घडवण्याची सुरुवात करण्यापासून ती भक्ताकडून खरेदी केली जाईपर्यंत वाट पाहावी लागते. त्यानंतरही मेहनतीप्रमाणे दाम मिळत नाही, परंतु टीचभर पोटासाठी हे मूर्ती कारागीर परंपरागत कला जोपासत आहेत.

जागतिकीकरणाच्या काळात दगडी वस्तूंना, मूर्त्यांना मागणी कमी झाली आहे. हलक्या- पोकळ फायबरच्या मूर्त्यांनी, दगडी देवांना ‘रिप्लेस’ केले आहे. फूड प्रोसेसरने पाटा- वरवंटा, खलबत्ता यांना तर कधीच मागे टाकले आहे, दगडी चुली स्वयंपाकासाठी नाही तर डिझायनर घरात ‘शो’ म्हणून बघायला मिळतात. त्यामुळे दगडी मूर्तिकारांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत.

तन- मन- धनाने आपल्या कलेला न्याय देणारे हे कारागीर नाईलाजाने स्वतःच्या मुलांना या दगडी मूर्तिकामाच्या व्यवसायात येऊ देणार नसल्याचे सांगतात. काळ्या, लाल दगडापासून देव-देवतांच्या मूर्ती, दिवे घडविणारे कारागीर रस्त्यावरच्या जगण्याला कंटाळले आहेत. या व्यवसायात पोट भरेल इतके सुद्धा उत्पन्न येत नसल्याने मुलांना चांगले शिक्षण देऊन इतर ठिकाणी नोकरी करण्याचे धडे देत आहेत.

त्यामुळे भारताच्या अनेक मंदिरांत, लेण्यांत वसलेली ही पूर्वापार चालत आलेली दगडी मूर्त्यांच्या कलेची श्रीमंती पुढील काही वर्षात लोप पावणार, अशी भीतीदायक शक्यता दुर्दैवाने नाकारता येत नाही.

खरे पाहता, या मूर्तिकारांना शासनाच्या योजनांचा योग्य लाभ मिळत नाही. या अत्यंत दुर्लक्षित, असंघटित गटापर्यंत योजना आजही पोहचत नाहीत. या समस्येवर लक्ष दिल्यास ग्रामीण भागातील कला आणि व्यवसाय तग धरू शकतील. यासोबत तुम्हां-आम्हां सर्वांनाच मातीशी पुन्हा बांधून घेण्याची गरज आहे. कला कोणतेही असो, तिचा योग्य सन्मान होणे गरजेचे, कलाकाराला आपल्या कलेचा अभिमान वाटावा असा समाज घडविणे इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच, ‘दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी’ ह्या शब्दांना अर्थ प्राप्त होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!