बंदिजनांवर आता तुरूंगातच उपचार

0

जिल्हा कारागृहात टेलिमेडीसीनची सुविधा सुरु

अहमदनगर (प्रतिनिधी) – कारागृहातील बंदिजनांना दर्जेदार वैद्यकिय सुविधा उपलब्ध करण्यासाठी टेलिमेडीसीन सुविधेची सोय करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकिय वैद्यकिय महाविद्यालये तसेच ठराविक शासकिय रूग्णालयांमध्ये टेलीमेडीसीन सेंटर उपलब्ध करण्यात आलेली आहेत. राज्यातील 51 पैकी 42 कारागृहात ही सुविधा सुरू करण्यात आली असून त्यात अहमदनगर जिल्हा कारागृहाचा समावेश आहे.
कारागृह सुरक्षा यंत्रणेतील सुधारणेबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सेवा निवृत्त पोलीस महासंचालक व अध्यक्ष, राज्यस्तरीय खरेदी समिती, संचलनालय, वैद्यकिय शिक्षण व संशोधन प्रविण दिक्षीत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीने सूचविलेल्या शिफारशीनुसार ही कारागृहातील बंदिजनांसाठी टेलिमेडीसीन सुविधेची सोय करण्यात आली आहे.
जिल्हा कारागृहात सध्या 4 व्हिडीओ कॉन्फरन्सींग युनिट आहेत. एन.आय.सी. (नॅशनल इन्फोर्मेटिक सेंटर) यांच्या मदतीने नुकतीच जिल्हा शासकिय रूग्णालय आणि अहमदनगर जिल्हा कारागृह यांच्यामध्ये टेलीमेडीसीन सुविधा कार्यान्वित करण्यासाठी यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 39 बंदीवर यशस्वितरित्या उपचार करण्यात आले.
27 जूनपासून टेलीमेडीसीन सुविधेची चाचणी सुरु झाल्यापासून दि.12 अ‍ॅागस्टपर्यंत जिल्हा कारागृहा मधील 39 आरोपींना टेलीमेडीसीन सुविधेसाठी जिल्हा शासकिय रूग्णालय येथील तज्ञ डॉक्टरांसमोर वैद्यकिय उपचार घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे हजर करून आरोपींना वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याच कालावधीत राज्यभरातील कारागृहांमधुन 800 बंदी बांधवांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा निवृत्त पोलीस महासंचालक व अध्यक्ष राज्यस्तरीय खरेदी समिती, संचालनालय, वैद्यकिय श्क्षिण व संशोधन, अप्पर पोलीस महासंचालक प्रविण दिक्षीत, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, संचालक, आरोग्य सेवा, डॉ. सतीष पवार, कारागृह पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत व जिल्हा कारागृहाचे सिनीअर जेलर शामकांत शेडगे यांनी प्रयत्न केले.

 

LEAVE A REPLY

*