जिल्हा परिषदेच्या 1300 शाळांना पट व गुणवत्तेमुळे कुलूप

0

प्रधान सचिव नंदकुमार यांची माहिती : शिक्षक संघटनांकडून संताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- पटसंख्या कमी असणार्‍या व शैक्षणिक गुणवत्ता ढासाळलेल्या जिल्हा परिषदेच्या राज्यातील 1 हजार 300 प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिली. शाळा बंद करण्याचे वक्तव्य केल्यानंतर शिक्षक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत प्रधान सचिव ते बोलत होते. यावेळी विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, शिक्षण संचालक सुनील चौहान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विश्‍वजीत माने, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, अर्चना गडे, शोभा खंडारे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, यांच्यासह मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते. शहरातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी प्राथमिक शिक्षकांना कानपिचक्या दिल्या. यावेळी नंदकुमार म्हणाले की, पटसंख्या खालवत असणार्‍या शाळा बंद करण्यात येणार असून त्या शाळा चांगली पटसंख्या असणार्‍या शाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहेत. हे करत असताना सरकारचा पैसा वाचवणे हा उद्देश मुळीच नाही. मात्र, ज्या पालकांना शाळेच्या गुणवत्ता कमी होत असल्याचे लक्षात आले ते त्यांचे पाल्य त्या ठिकाणाहून काढून दुसरीकडे पाठवतात. पण ज्या पालकांना हे कळत नाही, त्या पाल्यांचा पालक राज्याच्या शिक्षण विभागाचा प्रधान सचिव नंदकुमार होणार असे त्यांनी यावेळी सांगितले.

एका सवालात सभागृहात शांतता –
शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणात नाटक करू नये. गरीब माणसाच्या ताटातील अन्नातून कर रुपाने कपात करण्यात येणार्‍या पगारातून तुम्हाला पगार मिळतो, हे विसरू नये. शिक्षक जर शंभर टक्के पगार घेत आहे, तर विद्यार्थी शंभर टक्के प्रगत का होत नाही, असा सवाल नंदकुमार यांनी सभागृहात केला. या त्यांच्या वक्तव्याने सभागृहात शांतता पसरली होती.

गुणवत्तेच्या आवचे बिंग फुटले –
नगर तालुक्यातील पवारवाडीची शाळा जिल्ह्यातील चांगल्या शाळा असणार्‍या शाळांपैकी एक शाळा असल्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांना सांगण्यात आले. मात्र, या ठिकाणी गेल्यावर त्यांना दुसरीच्या वर्गातील एका मुलीला पाचपर्यंत अंक वाचता आले नाही. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणावर त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून तेथील शिक्षिका कारण सांगत होत्या. त्यावर नंदकुमार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यातून शिक्षण विभागातील गुणवत्तेचा आव आणणार्‍यांचे भिंग फुटल्याचे समोर आले.

अधिकार्‍यांनी विचार बदलावे –
नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाचे दिशाहीन सुरू आहे. शाळा भेटी देणारे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आदींचे काम चुकीच्या दिशेने सुरू आहे. ते योग्य दिशेने यायचे असेल तर अधिकार्‍यांना आपले विचार बदलावे लागतील, असे नंदकुमार म्हणाले.

राज्याला एक तरूण, तडफदार आणि शिक्षणाच्या गुणवत्तेचे ज्ञान असणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मिळाला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम आखलेला आहे. राज्यातील जनतेला जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता हवी आहे. त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम सक्तीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी काहींनी पाच वर्षे केवळ घोषण करत काढली असल्याची अप्रत्यक्ष टीका नंदकुमार यांनी यावेळी केली.

 

LEAVE A REPLY

*