प्रधानमंत्री ग्रामसडक निधीत खा. गांधींचा राहुरीला ‘ठेंगा’

0

अन्य तालुक्यांच्या पदरात भरभरून माप । राहुरीच्या पदरात छदामही नाही । नागरिकांचा रोष वाढला

राहुरी स्टेशन (वार्ताहर) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांना 20 कोटी रुपये मंजूर झाले. मात्र, राहुरी तालुक्यातील एकही रस्ता या निधीच्या यादीमध्ये नसल्याने या निधीत खासदार दिलीप गांधी यांनी राहुरीला ‘ठेंगा’ दाखविला असल्याने तालुक्यातील जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भौगोलिकदृष्ट्या राहुरी तालुका हा मोठा असून 98 गावे व वाड्यावस्त्यांचा तालुक्यात समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली असून या रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र, दुर्दैवाने या रस्त्याच्या कामांकडे कोणीच लक्ष देत नाही. खा. गांधीही याला अपवाद ठरलेले नसून त्यांच्या कडूनही तालुक्याला नेहमी सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याचे अनेकवेळा स्पष्ट दिसून आलेले आहे.
मग तो रस्त्याचा प्रश्‍न असो, अगर रेल्वेचौकीतील भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाचा असो! तांदूळवाडी येथे एका कार्यक्रमात आठ दिवसात रेल्वे रूळाखालील मोरी मोकळी करून देतो, अशी दर्पोक्ती खा. गांधींनी करून मोठा कालावधी लोटला. मात्र, मोरीच काय पण एक दगड अद्याप बाजूला झालेला नाही. त्यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्यच त्यांना लक्षात आले नसल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
विकासकामे मार्गी लावण्याऐवजी विकास कामात कोलदांडा घालण्याचे काम ते करीत असल्याची भावना राहुरीकरांमधे त्यांच्याविषयी निर्माण होत आहे. राहुरी स्टेशन येथे रेल्वे चौकीजवळ उड्डाणपुलासाठी मोठा खर्च करणे तसेच ‘साईड फिजिबल’ नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे मत असताना व भुयारी मार्गाच्या पर्यायाला रेल्वे अनुकूल असताना उड्डाणपुलाचा अट्टाहास करणे हा एकप्रकारे कोलदांडाच म्हणावा लागेल, असे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
राहुरी तालुका हा दोन मतदारसंघांत विभागला गेल्याने तालुक्याचे एकप्रकारे विभाजनच झाले असून हे विभाजनच तालुक्याच्या विकासाच्या मुळावर उठले आहे. दोन खासदार, विधानसभेचे दोन आमदार, एक पदवीधर व एक विधानपरिषदेचे असे चक्क चार आमदार लाभलेले असतानाही तालुक्यात विकास कामांना खीळ बसली ही तालुक्याची मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे खा. गांधी यांचे बालपण तालुक्यात गेले. सुमारे 10 वर्षे त्यांनी बारागाव नांदूर येथे वास्तव्य केलेले असताना राहुरीकरांकडून मिळालेल्या जिव्हाळ्याची व प्रेमाची कदर करून राहुरीला झुकते माप देतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. 10 वर्षाच्या वास्तव्यामुळे राहुरीकरांना ते आपलेसे वाटल्याने निवडणुकीत मतदारांनी त्यांना मतदान देत लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठविले, याचाही विसर खा. गांधींना पडला असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे मतदारसंघातील विविध गावांच्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यात राहुरी तालुक्यातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा खा. गांधींनी समावेश करणे गरजेचे होते, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. तर खा. गांधी हे राहुरी तालुक्यात सातत्याने संपर्क दौरेच करीत नसल्याने त्यांना तालुक्यातील रस्तेच माहीत नसावेत, अशी बोचरी टीकाही जनतेतून केली जात आहे. खासदारकीतून गांधींनी राहुरी तालुक्यात आतापर्यंत बोटावर मोजण्याएवढी कामे केली. तीही आपल्या जवळच्यांनाच दिल्याने ही कामेही नित्कृष्ट झाली असल्याने हा सर्व खर्च वाया गेला असल्याचा रोष व्यक्त होत आहे.
नव्याने मंजूर झालेल्या ग्रामसडक योजनेत पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे बुद्रुक रस्त्याकरिता एक कोटी 43 लक्ष, करंजी गावातील रस्त्याकरिता एक कोटी 73 लक्ष, आल्हणवाडी गावातील रस्त्याकरिता 81 लक्ष, वाळुंज ते दुलेचांदगाव रस्त्याकरिता एक कोटी 36 लक्ष असे पाथर्डी तालुक्याकरिता एकूण पाच कोटी 34 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव ते कोकाटेवाडी रस्त्याकरिता एक कोटी 36 लक्ष, दुकाळे वस्ती ते तालुका हद्द रस्त्याकरिता एक कोटी 17 लक्ष असा एकूण दोन कोटी 53 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
पारनेर तालुक्यातील चिंचोली घाट ते गदादेवाडी गावातील रस्त्याकरिता एक कोटी 39 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 222 ते माळवाडी गावातील रस्त्याकरिता 74 लक्ष, वाघुंडे हांगा ते साठे वस्ती रोडकरीता एक कोटी 18 लक्ष, धुमाळ वस्ती ते थोपटे वस्ती 64 लक्ष, देसवडे ते बोरमाळ रस्त्याकरिता तीन कोटी 44 लक्ष असे एकूण सात कोटी 40 लक्ष मंजूर झाले आहेत.
नगर तालुक्यातील रस्त्यांकरीता निमगाव वाघ ते जाधवमळा रस्त्याकरीता एक कोटी 16 लक्ष तसेच गुंडेगाव ते मानेवस्ती रस्त्याकरीता एक कोटी 69 लक्ष असा एकूण दोन कोटी 86 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील ताजू ते अंबालिका कारखान्यापर्यंत रस्त्याला 70 लक्ष तसेच पुलाकरिता 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, राहुरीच्या वाट्याला छदामही मिळाला नाही. याचा मोठा रोष राहुरी तालुक्यात निर्माण झाला असल्याने या रोषाला खासदार गांधी यांना आगामीकाळात सामोरे जावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नगर दक्षिण मतदारसंघातील पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत व नगर तालुक्यांतील विविध गावांमध्ये रस्त्याच्या कामाकरिता सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार गांधी यांनी देऊन राहुरीकरांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*