प्राथमिक शिक्षक समन्वय समिती नरमली

0

बीएलओचे मानधन वाढवून देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षक बीएलओचे काम करण्यास तयार आहेत. परंतु ज्या शिक्षकांच्या अडचणी आहेत, त्यांचा सकारात्मक विचार करावा, तसेच बीएलओंचे मानधन वाढवून मिळावे, अशी मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्याकडे केली. बीएलओचे काम नाकारणार्‍या शिक्षकांवर कारवाईचा इशारा देताच शिक्षकांच्या पाया खालील वाळू सरकरली आहे.
शिक्षक समन्वय समितीच्यावतीने डॉ. संजय कळमकर, राजेंद्र निमसे, एल. पी. नरसाळे, अशोक कानडे, कल्याण लवांडे, रवींद्र सुपेकर, संतोष बोरूडे, संजय पवार आदींनी मंगळवारी आनंदकर यांची भेट घेऊन चर्चा केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीचे काम करण्यासाठी शिक्षकांना बीएलओ म्हणून नेमले आहे. हे काम करण्यास नकार देणार्‍या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
परंतु शिक्षकांच्या समस्या लक्षात घेता निवडणूक शाखेने सकारात्मक धोरण घ्यावे. स्थानिक पातळीवर इतर कर्मचारी शिक्षकांना पर्याय म्हणून नेमावेत. मतदार नोंदणी विशेष मोहिमेसाठी सहायक द्यावेत, द्विशिक्षकी शाळेतील शिक्षक, आजारी किंवा महिला शिक्षकांना बीएलओचे काम देऊ नये. मतदारनोंदणीची मुदत वाढवावी, कोणत्याही शिक्षकांवर कारवाई करू नये, बीएलओंच्या मानधनात वाढ करावी आदी अनेक मागण्या शिष्टमंडळाने केल्या.
यावर आनंदकर यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. मानधन वाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. बीएलओंना दर महिन्याच्या पगारातच मानधन देण्याचा विचार आहे. दीर्घकाल काम करणार्‍या बीएलओंचे रोटेशन करू, विशेष मोहिमेसाठी सुटीचे दिवस विशेष रजा म्हणून सेवापुस्तिकेत नोंद करण्याचा विचार करू, असे आनंदकर यांनी सांगितल्याचे शिक्षकांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*