Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार

Share

वाळकी केंद्राला 2 लाखांचे तर उर्वरित 10 केंद्रांना प्रत्येकी 50 हजारांचे अनुदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाप्रमाणे निकष पूर्ण करणार्‍या जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात नगर तालुक्यातील वाळकी प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम आले आहे. वाळकी केंद्राला 2 लाख रुपये तर उर्वरित 10 केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात व अधिकारी, कर्मचार्‍यांनी त्यात सातत्य ठेवावे यासाठी शासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली.

पुरस्कारासाठी आरोग्य केंद्रांची निवड करताना विविध प्रकारचे मुद्दे अभ्यासण्यात आले. त्यात प्रसृती कक्ष, ऑपरेशन थिएटर यांचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमित निर्जंतुकीकरण करणे, त्याचे रेकॉर्ड ठेवणे. विविध उपकरणांचे शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर शास्त्रोक्त पद्धतीने निर्जंतुकीकरण करून देखरेखीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे. जैविक कचर्‍याची नियमानुसार विल्हेवाट लावणे व त्याचे प्रशिक्षण कर्मचार्‍यांना देणे. रुग्णालयाची अंतर्गत, बाह्य स्वच्छता ठेवणे व त्याचे वेळापत्रक तयार करून देखरेख ठेवणे.
यासह रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांना प्रतिबंधात्मक लसी देणे. रुग्णांना तपासतांना सर्व प्रतिबंधक उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आदी बाबी तपासण्यात आल्या होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार्‍या निधीचा विनियोग करण्यासंदर्भात शासनाने सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार 75 टक्के रक्कम ही आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी वापरावयाची आहे. त्याचा कृती आराखडा तयार करून राज्यस्तरावरून त्याची परवानगी घ्यायची आहे. 25 टक्के रक्कम ही अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्द्ध करण्यासाठी वापरायची आहे. त्याचे फोटो व रेकॉर्ड पुरावे म्हणून शासनाला पाठवावे लागेल.

जिल्हा गुणवत्ता आश्वासन सल्लागार डॉ. राहुल शिंदे यांनी आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या बदलांचे फोटो, रेकॉर्ड व कायाकल्प परीक्षणाचा अहवाल राज्य स्तरावर पाठविला होता. सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे हे पुरस्कार मिळाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

या केंद्रांना प्रत्येकी 50 हजार
* कोल्हार (ता. राहाता) * सावळीविहीर (ता. राहाता),
* कुळधरण (ता. श्रीगोंदा), * आढळगाव (ता. श्रीगोंदा), * लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) * रुईछत्तीसी (ता. नगर),* चास (ता. नगर) * पळवे (ता. पारनेर), मेहेकरी (ता. नगर) * कान्हूरपठार (ता. पारनेर).

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!