आधारभूत किंमत मिळत नसल्याने मका, सोयाबीन कवडीमोल

0
वीरगाव (वार्ताहर) – शेतीमाल खरेदी विक्रीच्या नियमन मुक्तीमुळे मका, सोयाबीन खरेदीत व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. नियमनमुक्तीने बाजार समित्यांचे नियंत्रण संपुष्टात आल्याने शेतकर्‍यांना आर्थिक तोटा सहन करून मका, सोयाबीन विक्री करावी लागत आहे.
अनेक शेतकर्‍यांचे मका आणि सोयाबीन उत्तम दर्जाचे असूनही व्यापार्‍यांकडून हमीभावाचे शेतकर्‍यांचे अधिकार विधेयक पायदळी तुडविला जातो. शेतीमाल विक्री करताना उत्पादकांना मिळणारा बाजारभाव उत्पादन खर्चाइतकाही नसल्याने भाव निर्धारण पध्दती अन्यायकारक आहे. शासनाने मका 1425 रुपये प्रतिक्विंटल आणि सोयाबीन 3050 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव निर्धारीत केला आहे.
परंतु या दोन्ही धान्यांची विक्री अनुक्रमे 900 रुपये आणि 2800 रुपये या भावाने चालू आहे. अशीच परिस्थिती साधारणपणे बाजरी, तूर, भुईमूग या धान्यांवर ओढवली आहे. वास्तविक सरकारने निर्धारीत केलेल्या आधारभूत किमतीत उत्पादन खर्चही निघत नाही.त्यामुळे सद्यस्थितीला मिळणार्‍या बाजारभावात मका, सोयाबीनचा उत्पादन खर्च भरून निघण्याऐवजी अधिक आर्थिक फटका बसतो.
त्यामुळे पिकांचे हमीभाव जाहीर करताना ते उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक ठेवावेत आणि राष्ट्रीय शेतकरी आयोगाने ठरवून दिलेल्या हमीदराने मालाचे मोल मिळावे अशी मका आणि सोयाबीन उत्पादकांची मागणी आहे. बियाणे, खते, औषधे, शेतीची मशागत, मजुरी या सर्वांचा विचार करता मिळणारे सारे उत्पन्न याच खर्चात जाते.स्वत: शेतमालकाच्या कष्टाचा तर विचार यात होतच नाही.

LEAVE A REPLY

*