५० हजार करदात्यांना मिळणार प्रीपेड स्मार्ट कार्ड

कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव योजना

0
नाशिक | दि.७ प्रतिनिधी – कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याकामी नाशिक महापालिका व येस बँकेच्या संयुक्त विद्यमाने प्रीपेड स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले असून नियमित कर भरणार्‍या नागरिकांना सदर प्रीपेड स्मार्ट कार्डच्या वाटपाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.

या प्रीपेड स्मार्ट कार्डद्वारे नागरिकांना महापालिकेच्या सर्व करांचा भरणा करता येणार आहे. तसेच हे प्रीपेड स्मार्ट कार्ड इतर कोणत्याही कार्डप्रमाणे सर्व ठिकाणी जसे की, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स व इतर ठिकाणी वापरता येणार आहे. नाशिक महापालिकेच्या नियमित कर भरणार्‍या ५० हजार नागरिकांना या कार्डकरिता कोणतेही शुल्क न आकारता मोफत देण्यात येणार आहे.

करदात्यांच्या नावांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून या करदात्यांना स्मार्ट प्रीपेड कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी एसएमएसद्वारेदेखील कळवण्यात येणार आहे. स्मार्ट कार्डकरिता नागरिकांना केवायसीची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे.

हे कार्ड मनपातील सर्व इ-सुविधा केंद्र, उपकार्यालये येथे कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येईल. या कार्डाद्वारे सर्व प्रकारची देयके, सेवा शुल्क भरता येईल. सदर कार्डवर कॅश रिलोड व कॅश ट्रेन्सफरसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केवायसीकरिता आधारकार्ड अनिवार्य असणार आहे.

कार्ड मिळणेकामी प्रस्तावित प्रक्रिया
* नोंदणीकरता नागरिकांना चालू मोबाईल क्रमांक द्यावा लागेल.
* निवडीनंतर नागरिकांनी आधारकार्डसह समक्ष उपस्थित राहावे.
* आधारकार्डाची नोंदणी तसेच स्कॅनिंग व अपलोडिंग केले जाईल.
* केवायसीकरता कागदपत्रांची छाननी होईल.
* पडताळणी टीमच्या मंजुरीनंतर कार्ड सक्रिय होईल.
* कार्ड सक्रियतेबाबत मोबाईलवर अलर्ट प्राप्त होईल.

LEAVE A REPLY

*