नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

0
नाशिक | दि. १ प्रतिनिधी- बंगालच्या उपसागरावरील मोरा चक्रीवादळ बांगलादेश किनारपट्टीवर स्थिर असून त्यामुळेच केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली. या बदलेल्या वातावरणामुळे २ व ३ जून रोजी राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता.
या पार्श्‍वभूमीवर आज जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, नाशिक तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. इतर तालुक्यात रिमझिम स्वरुपात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यामुळे मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात विदर्भ व मराठवाड्यातील तापमान ४० अंशावर असून ढगाळ वातावरणामुळे काही शहरांत तापमान ३५ अंशावर आले आहे.

बंगालच्या उपसागरावरील ङ्गमोराफ चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले असून त्याचा फटका किनारपट्टीवरील राज्यांना बसू लागला आहे. मेघगर्जनेसह वादळी पाऊस किनारपट्टीवरील काही राज्यांत सुरू झाल्यानंतर केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनमुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या बदलेल्या वातावणामुळेच राज्यात दोन दिवसांत विदर्भात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. या बदललेल्या हवामानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बदललेल्या स्थितीमुळे येत्या २ ते ५ जूनपर्यंत राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
याच पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाचा चटका अशी स्थिती दिसून आली. दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होत जाऊन पावसाचे चित्र जिल्ह्यातील बहुतांशी भागात दिसून आले. सायंकाळी एकदम काळे ढग जमल्याने पावसाला प्रारंभ झाला. निफाड, सिन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह दमदार पावसाने हजेरी लावत सर्वांची धावपळ उडवून दिली.

त्याचबरोबर नाशिक शहर व परिसरात नवीन नाशिक, सातपूर व आनंदवल्ली भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली.

LEAVE A REPLY

*