पोथ्या, पुराणांपेक्षा घटनेचे पुजारी व्हा : कांबळे

प्रागतिक विचार व्याख्यानमालेस येवल्यात उत्साहात सुरवात

0
येवला | आज घरा घरात वेगवेगळे साहित्य, धर्म ग्रँथ आहे मात्र राज्य घटना नाही. पोथ्या पुराणे वाचण्या पेक्षा राज्यघटनेचे केवळ वाचन नव्हे तर आपण घटनेचे पुजारी होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

समता प्रतिष्ठान येवला आयोजित 20 व्या प्रागतिक विचार व्याख्यान मालेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देशदूतचे संचालक संपादक विश्वास देवकर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती उषाताई शिंद उपस्थित होत्या. यावेळी महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करून तसेच झाडाला पाणी टाकून उदघाटन करण्यात आले.

या व्याख्यान मालेचे पहिले पुष्प ‘आम्ही भारतीय लोक’ या विषयावर उत्तम कांबळे यांनीं गुंफले. यावेळी कांबळे म्हणाले की, लोक शाही मार्गा ऐवजी, युद्ध कर म्हणणे, किंवा हिंसाचार कर म्हणणारा भगवतगीतेत आहे. आपल्याच आप्तस्वकीयांशी युद्ध करायला लावणे कितपत योग्य आहे?

त्या पेक्षा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी राज्य घटना श्रेष्ठ आहे. महात्मा गांधींना स्वातंत्र्य ऐवजी स्वराज्य हवे होते. त्यांना खेड्यांना महत्व दिले. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरू ज्यावेळी लाल किल्ल्यावरून भाषण करीत होते, त्या वेळी गांधीजी एका झोपडीत अश्रू ढाळत होते, असेही कांबळे म्हणाले.

जगातल्या सर्व राज्य घटनेत फक्त एक समानता होती ती म्हणजे प्रत्येक राज्य घटना स्वर्गातल्याना अर्पण केलेली होती, मात्र आपली राज्य घटना ही भारताच्या प्रत्येक माणसाला अर्पण केलेली आहे. ज्या समाजात ‘मी’ मोठा असतो तो समाज कधीही मोठा होत नाही. त्या करता ‘आम्ही’ जन्माला यावा लागतो. जो देश हत्यारांची पूजा करतो तो देश कधीच जिंकू शकत नाही. भारतात सोन्याचा धूर निघत होता. पण कधी, कुठे हे कुणीही सांगत नाही.

धर्माच्या राष्ट्राला अलगद उचलून त्याला आम्ही मध्ये गुंतवायचे आहे. इथल्या व्यवस्थेने माणसाचे तुकडे तुकडे केले होते. मात्र आम्ही ने ते तुकडे जोडले. लोक हा शब्द फार मोठा आहे. मात्र त्याचा अर्थ आज चुकीच्या अर्थाने वापरला जातो.

देवकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संविधानात सामान्य माणसाच्या समस्यांचा गुंता सोडवण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानात केले आहे. गरीबातला गरीब भाकरीच्या समस्येत आहे. या देशाच्या राज्य घटनेची जर व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर असे 26/11 होणार नाहीत.

ज्यांनी समाजाला चांगला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांना संपवण्याचे काम येथील व्यवस्थेने केले आहे. हा इतिहास खूप मागे जातो, मात्र काल परवाचे उदाहरण म्हणजे कलबुर्गी, दाभोळकर, ही आहेत. ज्या व्यवस्थेकडून मूल्ये कशी जपली पाहिजे याचे मार्गदर्शन करावे अशी व्यवस्था आज शांत असल्याचे जाणवले, ते जाहिरातबाजी करण्यास विसरले की काय? असा प्रश्न पडला.

मी त्या राज्य घटनेचा समर्थक आहे, ज्या घटनेने सर्वांना समानतेची वागणूक दिली. त्यांनी माणसाला प्राथमिकता दिली. असेही ते म्हणले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषाताई शिंदे यांचेही भाषण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मारोतराव पवार, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, भांडगे पैठणीचे संचालक राजेश भांडगे, डॉ. सुरेश कांबळे, प्रा. अजय विभांडीक, अविनाश पाटील, गुमानसिंग परदेशी, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, महेंद्र पगारे, अजीज शेख, पाहुण्यांचा परिचय प्रा. पुरुषोत्तम पाटील व नानासाहेब कुर्‍हाडे यांनी करून दिला.

सूत्रसंचालन व्याख्यान मालेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब गमे यांनी, तर प्रास्ताविक समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दिनकर दाणे यांनी केले.

LEAVE A REPLY

*