Video : विशेष विद्यार्थ्यांनी घेतला प्रज्ञायोगा शिबिराचा लाभ

Video : विशेष विद्यार्थ्यांनी घेतला प्रज्ञायोगा शिबिराचा लाभ

नाशिकरोड । संजय लोळगे

आर्ट ऑफ लिव्हिंग व्यक्तिविकास केंद्र संचलित नाशिक इन्फोर्मेशन सेंटरद्वारा आयोजित केलेल्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी दोन दिवसीय ‘प्रज्ञा योगा’ शिबिराचा समारोप झाला. शिबिरात सहभागी झालेल्या या विशेष विद्यार्थ्यांना अंतचक्षू शोधताना स्वत:तील सहाव्या इंद्रियाचा साक्षात्कार झाल्याचे दिसून आले.

श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने हिंसाचाररहित समाज व तणावमुक्त जीवनशैलीसाठी अ.भा. अपंग पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या दत्तमंदिर रोडवरील विकास मंदिर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या शिबिराचे आयोजन केले होते. विशेष मुलांसाठी त्यांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक निरोगीपणाला आकार देण्यासाठी श्रेया चुग व पल्लवी दत्त या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिकांनी सुयोग्य प्रशिक्षण दिले.

या दोन दिवसीय शिबिरात ध्यान, प्राणायाम यासह योगासनाचे धडे देण्यात आले. तरूणाईत वाढत असलेले नैराश्य, मद्यपान, धूम्रपान, आक्रमकता व हिंसा या समस्यांकडे लक्ष वेधून विद्यार्थ्यांच्या चिंता व आकांक्षा जाणून घेत त्या ध्यानधारणेद्वारे दूर करण्याचा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचा उद्देश आहे.

या शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांनी केवळ आकलनशक्तीने चित्र काढून त्यात रंगभरण केले. नि:स्वार्थ भावनेने आयोजित केलेल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.स्वाती बारपांडे, समीर तिटकरे, किरण शिंदे, निकिता मीरचंदानी, सीमा पाटील, त्रिलोकीनाथ गुप्ता, प्रदीप विधाळे, ज्ञानेश्वरी शिंदे, श्रावणी सातपुते, प्रीती पिल्ले, हर्षदा भावसार आदींनी परिश्रम घेतले.

प्रज्ञा योगामध्ये वैज्ञानिक परिमाणाच्या पलिकडे जाणार्‍या बाबींचा अंतर्भाव असून आधुनिक शिक्षण प्रणालीत प्रज्ञायोगामुळे आमुलाग्र बदल घडविण्याची क्षमता आहे.

पल्लवी दत्त, प्रशिक्षिका

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com