Friday, April 26, 2024
Homeनाशिकजि. प. स्थायी समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; 14 जानेवारीला होणार्‍या विशेष सभेत नियुक्त्या

जि. प. स्थायी समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; 14 जानेवारीला होणार्‍या विशेष सभेत नियुक्त्या

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता विविध विषय समित्यांवर दि. 14 जानेवारीला होणार्‍या विशेष सभेत नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक पसंती असलेल्या स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुंकांची संख्या अधिक आहे. या समितीमध्ये समावेश व्हावा, यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

- Advertisement -

स्थायी समिती सदस्य असलेल्या शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. तसेच खासदार डॉ. भारती पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे स्थायी समितीसाठी दोन सदस्यांची निवड होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या कोट्यातून या जागेसाठी दीपक शिरसाठ, रमेश बोरसे यांच्या नावांची चर्चा आहे; तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून सिद्धार्थ वनारसे, अमृता पवार यांची नावे आघाडीवर आहे. महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या बांधकाम समितीतील संजय बनकर, सुरेखा दराडे व अश्विनी आहेर यांची सभापती म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे या जागेवर संधी मिळावी, यासाठी स्पर्धा सुरू आहे.

विषय समित्यांसाठी 14 जानेवारीला विशेष सभा होत असून, राष्ट्रवादीकडे बांधकाम-अर्थ, कृषी-पशुसंवर्धन तर काँग्रेसकडे महिला बालकल्याण समिती आली आहे. शिवसेनेला आरोग्य-शिक्षण समिती व समाजकल्याण समिती मिळाली आहे. समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अश्विनी आहेर, सुशीला मेंगाळ, संजय बनकर व सुरेखा दराडे विजयी झाले. शिवसेनेला शिक्षण व आरोग्य समिती मिळाली असल्याने ही समिती सुरेखा दराडे यांना मिळणार हे निश्चित आहे.

राष्ट्रवादीकडे बांधकामसह कृषी व पशुसंवर्धन समिती आली आहे. यात उपाध्यक्ष डॉ. गायकवाड व बनकर यात समितीचे कसे वाटप होणार याबाबत उत्सुकता आहे. डॉ. गायकवाड यांनी बांधकाम समितीसाठी आग्रह धरल्याचे समजते. त्यासाठी त्यांच्याकडून फिल्डिंग लावण्यात येत असल्याची चर्चा आहे. परंतु, बनकर यांना बांधकाम समिती देण्याचे भुजबळ यांनी पूर्वनिश्चित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बनकर यांना बांधकाम समिती, तर उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांच्याकडे कृषी व पशुसवंर्धन समितीची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या