वादळाचा नाशिकला तडाखा; अनेक भागात बत्ती गुल

0
नाशिक । अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाचा विपरीत परिणाम नाशिक जिल्ह्यावरही दिसून आला. या वादळाचा फटका महावितरणला बसला असून यामुळे महावितरणचे फिडर नादुरूस्त झाल्याने अनेक भागात सुमारे सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

तो सुरळीत करताना वीज कर्मचार्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. केरळ, तामिळनाडूला मोठा तडाखा दिल्यानंतर ओखी चक्रीवादळ वेगाने पुढे सरकल्याने गोवासह राज्याच्या किनार्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वादळाचा विपरीत परिणाम म्हणून मुंबईसह मध्य महाराष्ट्रात सकाळपासून पावसाने हजेरी लावली.

दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरू होती. ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली असली तरी वातावरणात गारवा कमालीचा वाढला. दुपारनंतर वार्‍याचा वेग वाढल्याने गारठा चांगलाच वाढला.

या वातावरणाचा परिणाम शेती पिकांवर मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी महावितरणच्या फिडरलाही याचा फटका बसल्याचे दिसून आले. वार्‍याचा वेग आणि वादळामुळे तारा एकमेकांना चिकटणे, इन्सुलेटर गरम होऊन फुटणे, इन्सुलेटर पंक्चर होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. त्यामुळे शहर विभाग 1 आणि शहर विभाग 2 अशा शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे आठ ते दहा तास नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागले.

भारनियमनामुळे व्यापारी बाजारपेठांमध्येही व्यापार्‍यांना अंधाराचा सामना करावा लागला. काही ठिकाणी इन्व्हरर्टरच्या मदतीने भारनियमनाच्या समस्येवर पर्याय शोधण्यात आला, मात्र अधिक वेळ भारनियमन वाढल्याने इर्न्व्हटरच्या बॅटरीही डाऊन झाल्याने व्यावसायिकांनाही भारनियमनाच्या समस्येला तोंड द्यावे लागले.

महावितरणच्या तांत्रिक पथकाने तातडीने फिडर दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारपर्यंत काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात पथकाला यश आले. मात्र गंगापूररोड, कॉलेजरोड, अशोकस्तंभच्या काही भागात सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.

या भागात बत्ती गुल : नाशिक शहर विभाग 1
म्हसरूळ : एकता नगर, क्रिडा संकुल, कृषी उत्पन्न बाजारसमिती, अंबड, पंपिंग ः सहदेवनगर, विशाल पॉइर्ंट, विद्या विकास, मंगलवाडी, महींंद्रा अँड महींद्रा, टाकळी, गंगापुर, अशोकस्तंभ, एस.टी.कॉलनी, कृषी नगर, पी अँण्ड टी कॉलनी

शहर विभाग 2 : मधील पंचक फिडरवरील मोटवाणी, सायट्रिक, दुर्गा मंदिर, सिन्नर फाटा. उपनगर फिडरवरील समतानगर, इच्छामणी. मुक्तिधाम : आर्टिलरी, देवळालीगाव, लॅमरोड. टाकळी : टाकळी, मुंबई रोड. शिवाजीवाडी: भारतनगर, राजीवनगर. मखमलाबाद : बोरगड, धागूर. सारूळ :  विल्होळी, राजूर. बेळगाव ढगा ः संदीप फाऊंडेशन. देवळाली कॅम्प ः लॅमरोड, सदर बाजार परिसर.

LEAVE A REPLY

*