तापमानाची झळ पोल्ट्रीला

ेरोज शेकडो कोंबड्यांचे मृत्यू : फार्म बंद

0

मनमाड| दि.२७ प्रतिनिधी – तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून मनमाडमध्ये पारा थेट ४२ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पोल्ट्रीफार्म व्यवसायाला (कुक्कुटपालन) मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री फार्मधारकांनी अनेक उपाययोजना केल्या, तरी रोज शेकडो कोंबड्यांचे मृत्यू होत आहेत.

कांदा, द्राक्षे व डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा आता पोल्ट्रीफॉर्मसाठी ओळख निर्माण करीत आहे. सुशिक्षित तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले असून, अनेकांनी बँकांकडून कर्ज घेत, हा व्यवसाय सुरू केला आहे. मनमाड, चांदवड, नांदगाव, येवला व मालेगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत पोल्ट्री व्यवसाय सुरू आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोल्ट्रीचे शेड दिसू लागले आहेत. पोल्ट्रीफार्मधारक वेगवेगळ्या कंपन्यांकडून कोंबडीची पिल्ले घेऊन त्यांचे पालनपोषण करतात. ४५ दिवसांत कोंबडी तयार झाल्यानंतर त्या कंपनीला विकल्या जातात.

कोंबडीच्या पिल्लांना जास्त उष्णता व जास्त थंडीदेखील सहन होत नाही. त्यामुळे त्यांचे पालनपोषण करताना पोल्ट्रीफार्मधारकांना काळजी घ्यावी लागते. मात्र, यंदा तापमानाने सर्व रेकॉर्ड मोडीत पारा थेट ४२ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे.

वाढत्या उष्म्यापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्रीफार्मधारकांनी अनेक उपाययोजना केल्या, तरी दररोज शेकडो कोंबड्यांचे मृत्यू होत आहे. त्यामुळे पोल्ट्रीफार्मधारकांना आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के पोल्ट्रीफार्मधारकांनी मे महिन्यात कोंबड्यांच्या पिल्लांची नवीन बॅच टाकली नाही. त्यामुळे कोंबड्यांची आवक कमी, तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिकनचे भाव किलो मागे ४० ते ६० रुपयांनी वधारले आहेत.

चिकन खातेय भाव
मनमाड व नाशिक जिल्ह्यातील तब्बल ४० टक्के पोल्ट्रीफार्म बंद पडले आहेत. अनेक पोल्ट्रीफार्म बंद पडल्याने कोंबड्याची आवक कमी झाली असल्याने चिकनच्या दरात किलोमागे ४० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. अगोदरच पेट्रोल, डिझेलसह इतर वस्तूंचे भाव वाढल्याने नागरिक महागाईने त्रस्त झालेले आहेत. त्यातच आता चिकनच्या दरातही वाढ झाल्याने नागरिकांचा खिसा रिकामा होणार आहे.

LEAVE A REPLY

*