Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोस्ट कर्मचाऱ्यांचे उपवास आंदोलन; मागण्यांची पूर्तता न झाल्यास २१ नोव्हेंबरपासून बेमुदत बंद

Share
नाशिक | प्रतिनिधी 
पोस्ट खात्यातील रिक्त जागा तातडीने भराव्यात या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र व गोवा सर्कलमधील पोस्ट कर्मचाऱ्यांनी आज दि.१५ सामूहिक उपवास आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. पोस्ट कर्मचाऱ्यांच्या सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीने टप्प्याटप्प्याने उपोषण, धरणे, संप व बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला असून मागण्या पूर्ण न झाल्यास दि.२१ नोव्हेंबर पासून बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे.
टपाल विभागातील पोस्टमन पासून एमटीस व जीडीएस पर्यंत तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी टपाल कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली.
कामावर हजर असलेल्या या कर्मचाऱ्यांनी दिवसभर अन्नपाणी ग्रहण न करता सरकारच्यानिषेधार्थ उपवास केला. या अभिनव आंदोलनात जिल्हयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. उपाशीपोटी टपाल बटवाड्यासह सर्व कामे या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.या आंदोलनात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन- पोस्टमन अँड एमटीएस, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, ऑल इंडिया मेल मोटार सर्विस-मेलगार्ड अँड एमटीएस, नॅशनल युनियन मेल मोटार सर्व्हिस, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज-ग्रामीण डाकसेवक व ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
शुक्रवारी दि.१८) दिवसभराचे काम आटोपल्यावर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत डिव्हिजन कार्यालयांसमोर कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. दि.२४ ऑक्टोबरला सकाळी ६ ते दुपारी २ यावेळेत संप करण्यात येणार आहे. एवढे करूनही मागण्या पूर्ण न झाल्यास दि.२१ नोव्हेंबर पासून महाराष्ट्र व गोवा राज्यात बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सुभाष दराडे, जितू शिंदे, ब्रह्मदेव शेवाळे, पोपट देसाई, कृष्णा गायकवाड,  सुनील जगताप आदींनी केले आहे.
या आहेत मागण्या 
पोस्टमन, एमटीएस, मेलगार्ड व जीडीएसच्या रिक्त जागा भराव्यात, पोस्टमन व मेलगार्ड संवर्गातील सेवानिवृत्त व बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जानेवारी १९९६ च्या फरकाची थकबाकी मिळावी, ई-कॉमर्स पार्सलची नोडल वितरण पद्धती रद्द करावी, आरएमएस विभागातील सेक्शन एल ३५ सुरु करावी, खातेबाह्य रोजंदारी कर्मचाऱ्यांना मुख्य लेबर कमिशनरच्या सुधारित दरानुसार वेतन द्यावे, यापूर्वी झालेल्या वाटाघाटींमध्ये दिलेल्या आश्वासनांची सर्कल प्रशासनाने पूर्तता करावी.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!