ईद चंद्रदर्शनाची आज शक्यता

0
जुने नाशिक । पवित्र रमजानुलम मुबारक महिन्याचा उद्याचा 29 वा रोजा असून सायंकाळी ‘ईद-उल-फित्र’ च्या चंद्रदर्शनाची शक्यता आहे. उद्या रविवारी चंद्र दिसल्यास सोमवारी ईदचा मोठा सण मुस्लिम बांधव साजरा करतील, अन्यथा मंगळवारी ईद साजरा होईल.

दरम्यान शहर चांद कमिटीतर्फे ‘शहादत’ (ग्वाही मिळविण्यासाठी) साठी दोन प्रतिनिधी मुंबईला रवाना करण्यात येणार आहे. तर इतर ठिकाणी शाही मशिदीतून संपर्क करण्यात येणार आहे.

मुस्लिम बांधवाचा मोठा सण ‘ईद-उल-फित्र’ची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मागील महिनाभरापासून मुस्लिम बांधवांसह महिला, अबालवृध्द पवित्र रमजानुल मुबारक महिन्याचे रोजे ठेवत आहे. तर नुकतीच पवित्र शबे कद्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

यानिमित्त मशिदींमध्ये रात्रभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते. रमजान महिन्यातील 20 व्या रोजापासून प्रत्येक मशिदीत ‘ऐतेकाफ’ मध्ये बसलेल्या भाविकांचा देखील विश्वस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे रमजानची विशेष नमाज ‘तरावी’ चे नेतृत्व करणार्‍या ‘हाफीज’ पदवीधारक मौलानांसह स्थानीक इमाम, नायब इमाम व खिदमतगुजारांचे देखील सत्कार झाले.

आता उद्या रविवारी (दि.25) रमजान महिन्याचा 29 वा रोजा राहणार आहे. तर मागील महिना 30 दिवसांचा झाल्याने हा महिना 29 चा होण्याची शक्यता गृहीत धरुन उद्या चंद्रदर्शनाची शक्यता आहे. जर उद्या चंद्र दिसले तर सोमवारी ईदचा मोठा सण साजरा होणार आहे.

LEAVE A REPLY

*