पॉस मशीनद्वारे धान्यवाटप

जूनपासून जिल्ह्यात प्रणाली कार्यान्वित होणार

0
नाशिक | दि. २० प्रतिनिधी – स्वस्त धान्य दुकानांमध्ये ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरित करण्यात येणार आहे. ईपीडीएस प्रणालीद्वारे जूनपासून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक दुकानात पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन्स बसविण्यात आली असून त्यासाठी नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने दोन हजार ६०९ पीओएस मशीनची मागणी केली आहे. दोन जूनपर्यंत हे मशीन्स उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. अन्न व नागरी पुरवठा विभाग संगणकीकरणावर भर देत असून सध्या रास्तभाव दुकाने ऑनलाईन झाली आहे. याअंतर्गत आता यापुढे पॉईट ऑफ सेल (पीओएस) या बायोमेट्रीक प्रणालीद्वारे धान्य वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक रास्त भाव धान्य दुकानात पॉईट ऑफ सेल हे बायोमेट्रिक आधारित उपकरण बसवण्यात येणार आहे.

या उपकरणाद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून धान्य देण्याची व्यवस्था होणार आहे. येत्या काही दिवसातच ही यंत्रणा सर्व ठिकाणी बसविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने करावयाची तयारी याचा आढावा पाठक यांनी घेतला. शिधापत्रिका संगणकीकरण, सध्या शिधापत्रिका, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खाते क्रमांक पीडीएस डेटा बेसमध्ये समाविष्ट करण्याचे काम, आधार सिडींग आदी कामांचीही माहिती पाठक यांनी जाणून घेतली.

गरजू लाभार्थींपर्यंत धान्य पोहोचावे आणि रेशन धान्य वितरणात होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा बसावा हा या बदलांचा उद्देश आहे. रेशनिंग व्यवस्थेचे पूर्ण संगणकीकरण करणे हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचे पाठक यांनी सांगितले. त्याअंतर्गत रेशन कार्ड व तत्सम संबंधित सर्व माहिती संगणकांवर अद्ययावत करावयाच्या सूचना पुरवठा विभागाला करण्यात आल्या आहेत.

इपीडीएसवर डेटा प्युरिफिकेशनचे काम सुरू आहे. ज्या दुकानदारांकडे शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ दिले आहेत त्यांनाच धान्य दिले जाणार आहे. या प्रणालींतर्गत कोणत्या लाभार्थी कुटुंबाला किती धान्य द्यायचे हे पीओएस मशीनच निश्‍चित करणार असून त्याची ऑर्डर सप्लाय चेन मॅनेजमेंट सिस्टममध्येच (एससीएमएस) तयार होणार आहे असल्याचे पुरवठा अधिकारी नरके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*