अहमदनगर(कर्मयोगिनी) | पूजा चौधरी-बिन्नर : योगाचा आंतरराष्ट्रीय ठसा!

0

अकोले. जि.अहमदनगर, खेळाचा प्रकार – योगा व मल्लखांब
यश- आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत
सुवर्णपदकाची कमाई, गट : क्रीडा

अकोलेसारख्या दुर्गम भागातील अनेक खेळाडूंनी खेळाचे मैदान गाजविले. महिला खेळाडू तर सरस ठरल्या. त्यापैकी एक नाव म्हणजे पूजा चौधरी. तिने योगा आणि मल्लखांब खेळाच्या माध्यमातून अकोलेसह अहमदनगरच्या क्रीडा विश्‍वाला वलय मिळवून दिले. शालेय स्पर्धा गाजविणार्‍या पुजाने लिलया राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत आपले कसब सिद्ध केले. पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदाकांची कमाई करून आपल्या खेळाला आणि देशालाही अभिमानाचे क्षण दिले. पुजाचा हा प्रवास सोपा नव्हता. संकटांवर मात करत आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर पूजा एक यशस्वी खेळाडू ठरली. 

अकोलेसारख्या दुर्गम भागात संघर्ष केल्यानंतर योगा आणि मल्लखांब या क्रीडा प्रकारात यश मिळवत पूजा चौधरी या खेळाडूने अकोल्याचे नाव देशात गाजविले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच सुवर्ण पदक मिळवले. श्रीलंका येथे झालेल्या स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दोन वर्षे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. राष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्ण पदक पटकावणार्‍या पूजाने आपल्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीची दिलेली झळाळी अभिमानस्पद आहे.

पुजाचा 31 मार्च 1996 रोजी जन्म झाला. प्राथमिक शिक्षण ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मॉर्डन हायस्कूल येथे झाले. शिक्षण चालू असताना मैदानात बास्केट बॉल, हँड बॉल, कब्बडी, खो-खो, रोप मल्लखांब, योगा हे खेळ खेळता खेळता मैदानाचा लळा लागला. त्यातच पूजाने चौथीपासून योगा व मल्लखांब या खेळांकडे आपले लक्ष केंद्रीत केले. या खेळात कौशल्य आत्मसात करायला सुरुवात केली. तिला या खेळात आवड निर्माण झाली आणि तिला कुटुंबानेही खेळासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला.

शालेय पातळीवर खेळत असताना जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पूजा चौधरी(बिन्नर) नावाचा अल्पवधीतच नावलौकिक झाला. तसेच पूजाने पहिली राज्यस्तरीय स्पर्धा पाचवीत असताना गाजवली. यानंतर पूजाने मागे वळून बघितलेच नाही. एक सामान्य घरातून एका मुलीला खेळात करियर करण्यासाठी मिळालेला पाठिंबा व लाभलेले शिक्षकांचे मार्गदर्शन ही एक दुर्मिळ गोष्ट. पण पूजाच्या कौशल्यावर पालकांचा विश्वास होता. त्यामुळे ती एक आतंरराष्ट्रीय खेळाडू बनली.

दिल्ली आणि हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने योग या खेळात दोन्ही ठिकाणी सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी केलेली निवड सार्थ ठरवून पूजाने पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करत क्रीडाविश्वाचे लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रीलंका येथे जाणार्‍या संघात महाराष्ट्रातून पूजा ही एकटीच महिला खेळाडू होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा खेळताना मनावर एकप्रकारे दडपणही होते. या दबावातही तिने चांगली कामगिरी करून रौप्यपदक भारताला पटकावून दिले. गेल्या वर्षी झालेल्या स्टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशन आयोजित श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावत भारताचा झेंडा रोवला. या यशानंतर अकोल्यातून तिचे मोठे कौतुक झाले. समाजाकडून कौतुक, पाठबळ मिळाल्याने पूजा आणि तिचे आई-वडीलही सुखावले.

अकोले येथे अगस्ती महाविद्यालयात शिकत असताना तीचा प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असे. एनएसएसमध्ये काम करत असताना पुजाची सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. खेळात अग्रेसर असताना पूजा अभ्यासातही पुढे आहे. प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गात शिकत असताना सर्वोत्कृष्ठ विद्यार्थिनीचा पुरस्कार तीने पटकावला. करीअर म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग अशा अत्यंत टिपिकल गोष्टी पालकाच्या डोक्यात असतात. त्यापुढे करिअरविषयक धाव जात नाही. मुलांच्या आवडीनिवडी हेरून त्यांना स्वातंत्र्य दिले, त्यांच्यावर विश्वास टाकला की, तो ते सार्थ ठरवतात. पूजाने हेच सिद्ध केले.

या सर्व गोष्टी करत असताना शिक्षण काळात आणि खेळातही जोडीदाराची साथ(आकाश बिन्नर) लाभली. त्यांनी प्रत्येक वेळी पूजाला प्रोत्साहीत केले. आज पुजाने योगा आणि मल्लखांबच्या माध्यमातून क्रीडाक्षेत्रात अकोलेचे नाव उंचावले. तिचा हा प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला होता. ती खेळासाठी मेहनत घेत राहिली म्हणून यश हाती आले. तिची वाटचाल नव्या खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे.

 

 

LEAVE A REPLY

*